#MeToo आयुषमान खुरानाच्या पत्नीला नातेवाईकांनीच....

पहिल्या बाळाच्या जन्मानंतरही तिच्यावर या गोष्टीचं दडपण होतं. 

Updated: Oct 15, 2018, 08:02 AM IST
#MeToo आयुषमान खुरानाच्या पत्नीला नातेवाईकांनीच....   title=

मुंबई: #MeToo ही मोहिम आता सर्वव्यापी झाली असून, प्रत्येकजण याविषयी खुलेपणाने बोलत आहे. आपले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवत आहे. मुख्य म्हणजे लैंगिक शोषणाचा आणि सैतानी वृत्तीचा निषेध करत आहे. यात कलाविश्वाची भूमिका महत्त्वाची ठरत असून, सेलिब्रिटींमागोमागच आता आणखीही बऱ्याच व्यक्तींनी याविषयी काही महत्त्वाच्या पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. 

लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये आता आयुषमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप हिच्याही नावाचा समावेश झाला आहे. 

ताहिराने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या बालपणीच्या कटू आठवणी जागवल्या. त्या अशा आठवणी आहेत, ज्याचं दडपण ताहिराच्या मनावर बरीच वर्ष होतं. पहिल्या बाळाच्या जन्मानंतरही तिला या एका गोष्टीचं दडपण होतं. 

नातेवाईकांकडून लहान असतेवेळी आपल्याला होणारा स्पर्श अतिशय वेगळा होता, हे पोस्टमधून सांगत तिने #MeToo मोहिमेमुळे हा अनुभव सांगितला. 

नातेवाईकांचा साधा स्पर्शही कशा प्रकारे आपल्या मनात एक प्रकारची भीती बसवून जाऊ शकतो याविषयी तिने या पोस्टमध्ये लिहिलं. प्रियकर आणि पती म्हणून आयुषमान आपल्याला स्पर्श करायचा तेव्हाही तिला वेगळीच भीती वाटायची.

 ताहिराच्या मनावर असणारं दडपण आणि तिला आलेला वाईट अनुभव या साऱ्यातून बाहेर येण्यासाठी तिला खऱ्या अर्थाने मदत झाली ती म्हणजे आयुषमानच्या धाडसाची आणि त्याच्या नि:स्वार्थ प्रेमाची. 

अनेकदा नातेवाईक आणि जवळच्या व्यक्ती दुतोंडी ठरतात. त्यामुळे आपल्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगाचा इतर कोणालाही सामना करावा लागू नये, असंही तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच ताहिराने सोशल मीडियायवर आपल्या आजारपणीविषयी अगदी खुलेपणाने एक सुरेख अशी पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून तिने आपल्याला कॅन्सर असल्याचं स्पष्ट केलं होतं.

आजारपणाशी झुंज देत असतानाही तिने ज्या धाडली वृत्तीने ही पोस्ट शेअर केली आहे, ते पाहता तिला दाद देणंही तितकच महत्त्वाचं आहे.