मुंबई : कर्करोग अर्थात कॅन्सरचं वाढतं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून उभी ठाकलेली मोठी समस्या आहे. भारतात या रोगाचं प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. #worldcancerday म्हणजेच जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने एकिकडे जनजागृतीविषयक कार्यक्रम होताना कलाविश्वातील सेलिब्रिटीही या दिवशी आपल्या अनुभवांचं कथन करत या दुर्धर आजाराशी लढण्याची प्रेरणा दिली. यात सर्वाधिक लक्षवेधी पोस्ट ठरली ती म्हणजे अभिनेता आयुषमान खुरानाच्या पत्नीची म्हणजेच ताहिरा कश्यप हिची.
ताहिराने इन्स्टाग्रामवर तिचा एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्यावर कर्करोगामुळे करण्याच आलेल्या शस्त्रक्रियेचा व्रणही स्पष्टपणे दिसत आहे. ताहिराचा चेहरा या फोटोत पूर्णपणे दिसत नसला तरीही हलकीशी दिसणारी तिच्या चेहऱ्याची झलक आणि त्यावरुन व्यक्त होणारे भाव हे काही लपलेले नाहीत. तिने या फोटोसह लिहिलेलं कॅप्शन हे खऱ्या अर्थाने इतरांच्या अंगावरही काटा आणेल असंच आहे. मुळात ते वाचताना ताहिराच्या जिद्दीची दाद द्यावी तितकी कमीच असं वाटू लागतं.
'आज माझा दिवस आहे..... #worldcancerdayच्या हार्दिक शुभेच्छा. मी आशा करते की प्रत्येकजण हा दिवस त्यांच्या परिने साजरा करत असेल. त्याच्यासोबतच असणारे न्यूनगंड दूर सारत असेल. माझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिकच आहे असं मी मनापासून मानते. सुयोग्य असं काही नसतंच मुळी. तुम्ही जसे आहात तसं स्वत:ला स्वीकारण्यातच खरा आनंद आहे. माझ्यासाठीही हे सारं आव्हानात्मकच होतं. पण, हा फोटो पोस्ट करण्यामागे आजाराचा दिवस साजरा करणं हा हेतू नसून माझ्यातील एका अशा जिद्दीला साजरा करणं होता जी मला गवसली आहे', असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलं.
आयुष्यात वारंवार अडथळे येऊन, अपयशी होऊन, हतबल होऊन आपण हात टेकतो खरे. पण, इथे महत्त्वाची बाब ही आहे की या अपयाने खचून न जाता आपण कायम उभे राहतो, एक एक पाऊल केव्हा केव्हा तर अर्ध पाऊल पुढे जातो, ही महत्त्वपूर्ण आणि तितकीच सकारात्मक बाब तिने या पोस्टच्या माध्यमातून अधोरेखित केली. काही महिन्यांपूर्वी ताहिराने तिच्या या आजाराविषयी सोशल मीडियाच्याच माध्यमातून माहिती दिली होती. ज्यानंतर तिने विविध पोस्टच्या माध्यमातून या आजाराशी आपली झुंज कशा प्रकारे सुरु आहे, याची माहिती देत मोठ्या जिद्दीने परिस्थितीचा सामना केल्याचं पाहायला मिळालं.