मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या झारखंडच्या दौलतगंज परिसरात सिनेमाचं शूटिंग करत आहे.
या शूटिंग दरम्यान त्याने असे काही काम केले ज्याच्यामुळे त्याला रेल्वे प्रशासनाकडून दंड आकारण्यात आला आणि त्याचप्रमाणे लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. असं सांगितलं जात आहे की, अर्जुन आपला आगामी सिनेमा नास्तिकच्या शुटिंगसाठी झारखंडमध्ये आहे. यावेळी तो रेल्वे स्टेशन कॅम्पसमध्ये अगदी बिनधास्त सिगरेट ओढताना दिसला.
राकेश कुमार तिवारी नावाच्या दक्ष नागरिकाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. मग काय, पलामू सर्कल अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यासाठी अर्जुनला २०० रूपयांचा दंड ठोठावला. राकेश यांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग हा गुन्हा आहे. शूटींग पाहायला हजारो लोक आले होते. याठिकाणी अभिनेताच स्मोकिंग करत असेल तर लोकांमध्ये एक चुकीचा संदेश जाईल.
‘नास्तिक’चे शूटींग गत १७ डिसेंबरपासून सुरू झाले. झारखंडच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर या चित्रपटाचे शूटींग होणार आहे. गत गुरूवारी रांचीच्या जगन्नाथपूर ठाण्यात चित्रपटाचे काही दृश्ये शूट केली गेलीत. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांनाही संधी देण्यात येणार असल्याचे कळतेय. हा चित्रपट एका प्रामाणिक पोलिस अधिकाºयाची कथा आहे. अर्जुन रामपाल यात मुख्य भूमिकेत आहेत. बालकलाकार हर्षाली मेहता ही सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. हर्षाली यापूर्वी ‘बजरंगी भाईजान’मध्ये दिसली होती.