मुंबई : अभिनेता अनिल कपूर यांचं नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील चिरुण अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. वाढतं वय, या संकल्पनेनंच अद्यापही त्यांना स्पर्शही केला नाही, झक्कास अंदाज आणि तितकंच देखणं रुप अशी अनिल कपूर यांची झलक तरुणींच्या मनावर जणू वारच करुन जाते. पण, या साऱ्यासाठी अर्थात चिरतरुण दिसण्यासाठी ते काय करतात हे तुम्हाला माहितीये का?
हल्लीच अरबाज खानच्या Pinch या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या जीवनाशी संबंधीत अनेक प्रश्नाची उत्तरं दिली. अनिल कपूर तरुण दिसण्यासाठी सापाचं रक्त पितात, कायमच त्यांच्यासोबत एक प्लास्टिक सर्जन असतो, असं म्हणणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिलं.
अरबाजच्या शोमधील एका सेगमेंटमध्ये एक व्हिडीओ दाखवण्यात आला. ज्यामध्ये अनिल कपूर यांच्याविषयी प्रेक्षक मोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एकाने म्हटलंय की अनिल कपूर यांना ब्रह्मदेवाचं वरदान आहे. तर, दुसरा एकजण म्हणाला, मला असं वाटतंय की ते कायमच एक प्लास्टिक सर्जन आपल्यासोबत नेतात. दुसऱ्या एकानं तर थेट ते सापाचं रक्त पितात असं म्हणत त्यांच्या चिरतरुणपणाचं गुपित उघड करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्यक्षात मात्र हे सारंकाही काल्पनिक विचारांत असून, सापाचं रक्त वगैरे ते काही पित नाहीत हेच खरं. हो पण, शरीराची काळजी घेत आहार आणि व्यायामाच्या सवयींचं मात्र ते काटेकोरपणे पालन करतात हे नाकारता येत नाही.
'मिस्टर इंडिया', 'लाडला' या आणि अशा अनेक चित्रपटांमधून अनिल कपूर यांनी आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कलाविश्वात त्यांच्या कुटुंबाला मानाचं स्थान आहे. असं असलं तरीही या साऱ्यामध्ये अनिल कपूर यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. चित्रपटांसोबतच अनिल कपूर विविध जाहिराती आणि वेब सीरिजच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.