कडाक्याच्या थंडीने बिग बींची 'ही' अवस्था

ये सर्दी सर पे बीती.... 

Updated: Dec 14, 2019, 03:30 PM IST
कडाक्याच्या थंडीने बिग बींची 'ही' अवस्था  title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कायमच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी माहिती देत असतानाच एक अशी पोस्ट केली आहे ज्यामध्ये ते सर्वांचं लक्ष वेधत आहेत. सध्या सुरु असणारी कडाक्याची थंडी एकिकडे देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत करत असतानाच आता बिग बींनीही त्याच्याशीच निगडीत एक पोस्ट दिली आहे. 

अमिताभ बच्चन येत्या काळात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण सध्या हिमाचल प्रदेशच्या बर्फाच्छादित भागात सुरु आहे, जेथे त्यांना उणे ३ अंश इतक्या तापमानात काम करावं लागत आहे. याच परिस्थितीविषयी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

'Yeti yeti yeti 
ये सर्दी सर पे बीती 
तन ढका , अंग ढका , ढका पूर्ण शरीर 
मन को ढकने से बाज़ रहे , यही है तक़रीर  ~ अब', असं लिहित बच्चन यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी बर्फाच्छादित प्रदेशात वापरतात असा एक कोट त्यांनी घातल्याचं लक्षात येत आहे. ज्यामुळे जवळपास त्यांचा संपूर्ण चेहराच झाकला गेला आहे. त्यांचा हा फोटो पाहता त्या परिसरात नेमकं किती तापमान असेल याचा सहज अंदाज येत आहे. 

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट तीन भागांमध्ये साकारला जात आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर आणि आलिया ही खऱ्या आयुष्यातील सेलिब्रिटी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. त्यातही बिग बींसोबत या कलाकारांची वर्णी लागल्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.