ब्रिटीशांविरोधात पहिल्यांदाच आवाज उठवणाऱ्या 'त्या' व्यक्तीची झलक पाहाच

स्वातंत्र्यपूर्व काळातील...

Updated: Aug 21, 2019, 10:40 AM IST
ब्रिटीशांविरोधात पहिल्यांदाच आवाज उठवणाऱ्या 'त्या' व्यक्तीची झलक पाहाच title=

मुंबई : बॉलिवूडसोबत गेल्या बऱ्याच काळापासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचंही भारतीय कलाविश्वात मोलाचं योगदान पाहायला मिळत आहे. अतिभव्य सेट आणि तितक्याच प्रभावी कथानकांच्या आणि कलाकारांच्या बळावर हे कलाविश्वही मनोरंजन जगतात मुख्य प्रकाशझोतात आलं आहे. येत्या काळात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत साकारलेल्या अशाच एका चित्रपटाता गाजावाजा सर्वांना पाहायला मिळणार आहे. 

नुकतच या बहुचर्चित चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे, 'सेरा नरसिंहा रेड्डी'. सत्य घटनांचा आधार घेत आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रसंगांचा आधार घेत या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे. 

ब्रिटीश राजवटीविरोधात आवाज उठवत पहिल्यांदाच स्वातंत्र्याचा रणसंग्राम पुकारणाऱ्या उय्यालावाद नरसिंहा रेड्डी यांच्या कार्यावर चित्रपटाचं कथानक भाष्य करणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात नरसिंहा रेड्डी यांच्या गुरुच्या भूमिकेत दिसणार आहेत. मुख्य म्हणजे चित्रपटाच्या टीझरमधून बिग बींच्या भूमिकेवरुन पडदा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे या भूमिकेविषयीची उत्सुकता कायम आहे. 

राम चरण याची निर्मिती असणारा हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अतिभव्य सेट, तगडी स्टारकास्ट, दिग्दर्शन आणि निर्मितीचा आधार आणि दमदार कथानक यांच्या बळावर या चित्रपटाकडून चांगलं प्रदर्शन केलं जाण्याच्या फार अपेक्षा बाळगल्या जात आहेत. त्यामुळे 'बाहुबली'च्याच पावलावर पाऊल ठेवत हा चित्रपटही विक्रमांची इमारत रचतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.