मुंबई : सेलिब्रिटी किड्सच्या यादीत सुहाना खान, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि आणखी काही नावांचीच चर्चा पाहायला मिळते. याच यादीत गेल्या काही दिवसांपासून एक नवं नाव जो़डलं गेलं आहे. ते नाव आहे, इरा खान हिचं. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओेळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान, याची ही लेक.
पहिली पत्नी रिना दत्ता आणि आमिरची ही लेक सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. मुख्य म्हणजे तिलाही वडिलांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत करिअर करायचं आहे. त्यादृष्टीने तिची तयारीही सुरु आहे. इराच्या कारकिर्दीला कलाविश्वात सुरुवात झाली नसली तरीही प्रायोगिक तत्वावर ती बरीच व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी ती एका टॅट्टूमुळे चर्चेत आली होती. ज्यामागोमाग आता ती सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. कारण, इराने तिच्या खासगी आयुष्याविषयी एक मोठा उलगडा केला आहे.
इन्स्टाग्रामवर 'आस्क मी सेशन'मध्ये इराला एका फॉलोअरने तू कोणाला डेट करतेस का? असा प्रश्न विचारला. त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत इराने थेट काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या तिच्या प्रियकरासोबतचा एक फोटो पोस्ट केला. इतकच नव्हे, तर तिने या पोस्टमध्ये मिशाल कृपलानी या तिच्या प्रियकराला या पोस्टमध्ये टॅगही केलं.
इराचा हा अंदाज पाहता खासगी आयुष्याविषयी तिने हा महत्त्वाचा खुलासा केल्याचं स्पष्ट होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराचा प्रियकर हा एक संगीतकार असून, इराने स्वत: त्याच्या काही म्युझिक व्हिडिओंचं दिग्दर्शनही केलं आहे. सोशल मीडियावरही ती मिशानसोबतचे काही सुरेख फोटो नेहमीच शेअर करत असते.