'ब्लॅक फ्रायडे' फेम जितेंद्र शास्त्री यांचे निधन; संजय मिश्रा यांची भावनिक पोस्ट

ब्लॅक फ्रायडे, इंडियाज मोस्ट वॉन्टेड चित्रपटात साकारल्या होत्या महत्त्वाच्या भूमिका

Updated: Oct 15, 2022, 03:49 PM IST
'ब्लॅक फ्रायडे' फेम जितेंद्र शास्त्री यांचे निधन; संजय मिश्रा यांची भावनिक पोस्ट title=

बॉलिवूडमधून सर्वात वाईट बातमी समोर आली आहे. 'ब्लॅक फ्रायडे' चित्रपटातील अभिनेते जितेंद्र शास्त्री (Jitendra Shastri) यांचे निधन झाले आहे. इंडस्ट्रीतील त्यांचे ओळखीचे लोक त्यांना 'जीतू भाई' म्हणायचे. जितेंद्र शास्त्री यांनी चित्रपटांमध्ये छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. अभिनेता संजय मिश्रा (sanjay mishra) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून जीतेंद्र शास्त्री यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्याने जितेंद्र यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे.

संजय मिश्रा (sanjay mishra) यांनी जितेंद्र यांच्यासोबत (Jitendra Shastri) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही बर्फाच्छादित ठिकाणी आहेत. "जीतू भाई, तुम्ही असता तर तुम्ही असे काहीतरी म्हणाला असता की, 'मिश्रा, कधी कधी असे होते की नाव मोबाईलमध्ये राहते आणि व्यक्ती नेटवर्कबाहेर निघून जाते. आता तुम्ही नाही आहात. या जगात. पण तुम्ही नेहमी माझ्या हृदयात आणि मनात असाल. ओम शांती," असे संजय मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अभिनेते जितेंद्र शास्त्री (Jitendra Shastri) केवळ फिल्मी पडद्यावरच नव्हे तर थिएटर विश्वातही प्रसिद्ध होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे कौशल्य शिकले. जितेंद्र शास्त्री यांनी 'लज्जा', 'दौर', 'चरस', 'ब्लॅक फ्रायडे' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटासाठी त्याचे विशेष कौतुक झाले. या चित्रपटात त्यांनी नेपाळमधल्या एका गुप्तचराची भूमिका केली होती.