मुंबई : अभिनय विश्वात बिग बी अमिताभ बच्चन म्हणजे अनेकांसाठी प्रमाण. या क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या या महानायकाचा आज वाढदिवस. वयाचा वाढता आकडा बच्चन यांच्या उत्साहाला आणि लोकप्रियतेला बदलू शकलेला नाही. असे हे बिग बी कित्येत नवख्या कलाकारांसाठी गुरुस्थानी आहेत. पण, तुम्हाला माहितीये का, या क्षेत्रात बिग बींच्या गुरुस्थानी कोण होतं...?
अमिताभ बच्चन यांच्या गुरुस्थानी असणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव आहे, फ्रँक ठाकूरदास. दिल्ली विद्यापीठातील किरोडीमल महाविद्यालयाच नाट्य प्रशिक्षक फ्रँक ठाकूरदास यांनी जर मितभाषी आणि काहीसा लाजरा स्वभाव असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केलं नसतं तर, बहुधा आज ते या क्षेत्रातही सक्रीय नसते.
ठाकूरदास यांच्याशी पहिल्याच भेटीनंतर बिग बींचं आयुष्य पुरतं बदलून गेलं. फ्रँक ठाकूरदास महाविद्यालयात अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावत. एक इंग्रजी प्रशिक्षक असण्यासोबतच ते महाविद्यालयाच्या नाट्य विभागातही महत्त्वाच्या भूमिकेत असायचे. एका मुलाखतीत बच्चन यांनी ठाकूरदास यांच्याविषयीची माहिती दिली होती. पहिल्या भेटीतच मी त्यांच्यापासून प्रभावित झालो होतो असं म्हणत व्यासपीठ आणि रंगमंचावरची प्राथमिक शिकवण त्यांच्याकडूनच मिळाल्याचं अमिताब बच्चन म्हणाले होते.
शब्दफेक, संवाद कौशल्य, अभिनय कशा प्रकारे करावा याचं शिक्षण त्यांना ठाकूरदास यांच्यामुळेच मिळू शकलं. महाविद्यालयीन नाटकांमध्ये स्वारस्य दाखवणारे अमिताभ फ्रँक यांच्या प्रेरणेने पुढे फक्त महाविद्यालयातच नव्हे, तर दिल्लीती विविध भागांमध्ये आपल्या नाटकाच्या चमूतून ही कला सादर करु लागले.
एक अभिनेता म्हणून नावारुपास येणारे अमिताभ बच्चन हे फ्रँक ठाकूरदास यांचे पहिले शिष्य होते. यापुढे त्यांनी शक्ती कपूर, सतीश कौशिक, कुलभूषण खरबंदा यांसारख्या अनेक कलाकाराना नावारुपास येण्यास मदत केली. प्रत्येकाच्या कलागुणांना अपेक्षित वाव देण्याकडेच त्यांचा कल असायचा. आजही ही कलाकार मंडळी फ्रँक ठाकूरदास यांचे कायमच ऋणी आहेत.