मुंबई : 'बच्चन.... सिर्फ नाम ही काफी हैं...' असं म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर उभे राहतात ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि त्यांचं संपूर्ण बच्चन कुटुंब. ज्या आडनावासाठीही त्यांची ओळख आहे अशा कधीही न ऐकलेल्या आणि अतिशय वेगळ्या आडनावामागची खरी कहाणी बिग बींनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सांगितली. २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीनिमित्तच्या खास भागात त्यांनी याविषयीचा उलगडा केला.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिंदेश्वर पाठक हे या खास भागातील विशेष अतिथी होते. त्यांनी ज्यावेळी समाजातील दलितांकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन आजही फारसा चांगला नाही, याविषयी वक्तव्य केलं तेव्हा बच्चन यांनी याविषयी आपलं मत मांडलं.
आपले वडील हरिवंशराय 'बच्चन' हे होळीच्या सणाची सुरुवात मैला साफ करणाऱ्यांच्या पायाला रंग लावून करत असत. आजही ही परंपरा अमिताभ बच्चन यांनी सुरु ठेवली आहे. बच्चन आपण कोणत्याही धर्माशी संबंधित नसल्याचं सांगत त्यांनी यावेळी आपण गर्वाने एक भारतीय असल्याची भावना व्यक्त केली.
''मुळात माझं बच्चन हे आडनाव कोणत्याही धर्माशी संबंधित नाही. माझे वडील त्याविरोधात होते. माझं आडनाव हे श्रीवास्तव होतं. पण, आम्ही त्यावर कधीच विश्वास ठेवला नाही किंवा ते फारसं गांभीर्याने घेतलं नाही. मी गर्वाने सांगतो की, असं (बच्चन) आडनाव लावणारा मी पहिलाच आहे'', असं सांगत त्यांनी आपल्या वडिलांनी लिखाणादरम्यान वापरलेल्या टोपणनावाचा आपण दैनंदिन जीवनातील नावात वापर केल्याचं स्पष्ट केलं. जेव्हा जेव्हा जनगणनेसाठी अधिकारी माझ्या घरी येता आणि ते माझ्या धर्माविषयी विचारतात तेव्हा मी कोणत्याही धर्माचा नसून एक भारतीय आहे, असंच सांगत असल्याचं बच्चन यांनी स्पष्ट केलं.
वाचा : 'कंगनाला जीव जाईपर्यंत मारलेलं, माझ्यावर जवळपास एक लिटर ऍसिड फेकलेलं....'
वेगळेपण जपण्यासाठी बच्चन कुटुंबीय कायमच सर्वांचं लक्ष वेधतात. अनेक बाबतींत ते काही आदर्शही प्रस्थापित करतात. एकिकडे देशात धर्म, पंथ, जात, वर्ण अशा बाबतीत अजुनही बरीच निराशा पाहायला मिळते तिथे अशी उदाहरणं कायम समाजाला एका चांगल्या दिशेला नेण्यास कारणीभूत ठरतात, असंच म्हणावं लागेल.