मुंबई : प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की, त्याला बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना थेट भेटता यावं. त्यांच्याकडून आपल्या कामाचं कौतुक झालं तर मग काय अगदी चाँद चाँदचं लागले. बॉलिवूड असो वा मराठी सिनेसृष्टी प्रत्येक कलाकार हे स्वप्न उरात बाळगूनच काम करत असतो. पण जेव्हा बॉलिवूडचे शहनशाहच एका मराठी कलाकाराचे पाय धरतात तेव्हा. हा क्षण फक्त त्या कलाकारासाठीच नाही तर इतर कलाकारांना आणि प्रेक्षकांना भावूक करणारा असतो.
हा सुवर्णक्षण अनुभवलाय मराठमोळा विनोदी अभिनेता समीर चौघुले यांनी. विनोदाचा बादशाह ठरलेल्या समीर चौगुले संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवलं आहे. 'हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे हसवण्याचं व्रत कायमच आहे. आणि हेच निमित्त ठरलं बिग बी यांना भेटण्याचं.
नुकतेच 'हास्यजत्रा' कार्यक्रमाचे संपूर्ण कलाकार बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना भेटले. अमिताभ बच्चन "हास्यजत्रा' हा कार्यक्रम आवर्जून बघतात. ''आप सब ये कैसे कर पाते हो?....एक मिनिटमे इतका बडा लाफ्टर क्रियेट करना,,..बहोत बढीया ...आप सब कमाल हो ”या शब्दात अमिताभ बच्चन यांनी टीमचं कौतुक केलं.
समीर चौघुले यांनी कायमच महाराष्ट्राला आनंद दिलाय. आणि हाच आनंद त्यांनी बिग बींना देखील दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी समीर चौगुलेंच फक्त तोंड भरून कौतुकच केलं नाही तर त्यांच्या विनोदाच्या टाईमिंगसमोर नतमस्तक देखील झाले.
हा क्षण फक्त समीर चौघुले यांनाच नाही तर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ज्या दिग्गज कलाकाराला बघून आपण या क्षेत्रात येतो. त्याच्याकडूनच आपलं एवढं कौतुक ऐकणं हे त्या कलाकारासाठी आयुष्याचं सोनं झालं या प्रमाणेच असणार आहे. हाच आनंद समीर चौघुले यांनी अनुभवला.
तो क्षण...आयुष्यभर काळजाच्या कुपीत साठवून ठेवण्याचा....मेंदूत त्या क्षणाची पर्मनंट “एफडी” करून ठेवण्याचा...खूप वेळ भारावून जाण्याचा..तो क्षण आपल्या आयुष्यात एकदा तरी येतोच हे काल सिद्ध झालं.......काल सोनी मराठीचे हेड अजय जी भालवणकर आणि आमचे मित्र आणि सोनी मराठीचे नॉन फिक्शन हेड अमित फाळके यांच्या सहयोगामुळे आम्हा कलाकारांचे स्वप्न पूर्ण झालं.. महानायक श्री अमिताभ बच्चन यांची प्रत्यक्ष भेट झाली...आणि हि भेट आमच्या “महाराष्ट्राची हास्यजत्रे”मुळे झाली याचं आम्हाला सर्वांनाच अत्यंतिक समाधान आहे....बच्चनसर हास्यजत्रा नियमित बघतात आणि खूप एन्जोय करतात हे त्यांच्याकडून ऐकण हे केवळ स्वप्नवत होतं...बच्चनसर समोर असून हि दिसत नव्हते..कारण डोळ्यात साचलेल्या आसवांनी दृष्टीला थिजवल होतं..आसव हि वेडी ‘वाहणं’ हा गुणधर्म विसरून साचून बघत राहिली होती...पण इवलेसे कान मात्र नदीच पात्र होऊन ऐकत होते......बच्चनसर...२५ मिनिटे बोलले फक्त हास्यजत्रेबद्धल....”आप सब ये कैसे कर पाते हो?....एक मिनिटमे इतका बडा लाफ्टर क्रियेट करना,,..बहोत बढीया ...आप सब कमाल हो ” हे असले संवाद बच्चन सरांकडून ऐकण हे अविश्वसनीय नाहीय का हो? ..
हे सगळ यश आहे आमच्या “हास्यजत्रा कुटुंबा”चं...आमचे दोन खांदे पिलर्स सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, आमचे सर्व तंत्रज्ञ, backstage कलाकार, स्पॉट बोईजदादा, मेकअप, costume, आर्ट डिपार्टमेंट, सर्व क्रियेटिव्ह आणि लेखक, आणि आम्ही कलाकार यांच्या एकत्रित कष्टायचे हे फळ आहे..आणि अर्थात सोनी मराठीच्या संपूर्ण टीमचा खंबीर पाठिंबा यावर हि जत्रा लोकांची टेन्शन दूर करण्याची खरी मात्रा ठरतेय याचं खूप समाधान आहे. मनःपूर्वक आभार सोनी मराठीचे अजय भालवणकरसर, अमित फाळके, गणेश सागडे, अमित दीक्षित, सिद्ध्गुरू जुवेकर यांचे ...निखळ मनोरंजन करण्याच्या एकमेव हेतू मनात ठेऊन भरलेली आमची महाराष्ट्राची हास्यजत्रा आता सोमवार ते गुरुवार रात्री ९ ते १० सोनी मराठीवर भरणार आहे......यायला विसरू नका..
मी “जंजीर” या चित्रपटाला माझा जुळा भाऊ मानतो कारण त्याचा हि जन्म १९७३चा आणि माझा हि १९७३चा ...आम्ही अनेक वर्षे एकत्र सुखाने एकाच शरीरात जगतोय...पण आम्हा दोघांमध्ये एक फरक आहे...मी स्वभावाने खूप मिळमिळीत आणि बोथट आहे..आणि हा भाऊ मात्र खूप टोकदार आहे..हा एवढ्या वर्षात इतका आत रुतलाय कि तो आता बाहेर काढणं अशक्य आहे...पण आम्हा भावंडांच्या जोडीला कालपासून हि “बच्चनसरांशी भेट” नावाची एक बहिण हि आयुष्यभरासाठी रुतलीय....आम्ही सुखात आहोत.
अशी पोस्ट त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांच्या कौतुकाचा पाऊस पडत आहे. संपूर्ण मराठी विश्वासाठी हा भावनिक क्षण आहे.