मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता भाऊ कदम यांचा पांडू नावाचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं गाणं रिलीज झाल्यानंतर काही तासांनी हिट झालं आहे. हे गाणं पाहताना, ऐकताना तुम्हाला दादा कोंडके यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या गाण्याला तसा बाज देण्यात आला आहे. तसेच आताची ट्रेन्डिंग बुलेट यावेळी या गाण्यात चर्चेला आली आहे.
या गाण्यात भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णी यांची अनोखी केमेस्ट्री दिसून आली आहे. दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटाची तुम्हाला नक्कीच आठवण होईल. दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची केमेस्ट्री पडद्यावर साकारण्याचा हा चांगला प्रयत्न झाला आहे. गायक उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या गायनाची आठवण तुम्हाला गायिका वैशाली सामंत, आणि गायक अवधुत गुप्ते यांनी करुन दिली आहे. हा प्रयत्न अतिशय अप्रतिम आहे.
हा सिनेमा झी स्टु़डिओचची निर्मिती आहे. पांडू हा सिनेमा ३ डिसेंबर २०२१ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. हा पांडू पुन्हा एवढ्या वर्षानंतर आणि यातही नव्या प्रेक्षकांना नवीन काय देतो, हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजणार आहे.