अवघ्या 4 दिवसांत 'बाला'ची 50 करोडहून अधिक कमाई

सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद 

Updated: Nov 12, 2019, 01:08 PM IST
अवघ्या 4 दिवसांत 'बाला'ची 50 करोडहून अधिक कमाई  title=

मुंबई : आयुष्मान खुराना सध्या बॉलिवूडमध्ये चालणारं खणखणीत नाणं आहे. कोणत्याही साच्यात टाका तो परफेक्टच असणार असं काहीसं अभिनेता आयुष्मान खुराना बद्दल झालंय. 2012मध्ये 'विक्की डोनर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आयुष्मानने आपल्या प्रत्येक सिनेमाची दखल चाहत्यांना घ्यायला लावली आहे. 

नुकताच आयुष्मानचा 'बाला' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने अगदी सुरूवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. 'बाला' सिनेमातून आयुष्मानने संवेदनशील विषय मनोरंजक पद्धतीने मांडला आहे. या सिनेमाचं समीक्षकांनी देखील कौतुक केलं आहे. 

शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने वेगळे विक्रम रचायला सुरूवात केली आहे. चार दिवसांत या सिनेमाने केलेली कमाई कौतुकास्पद असून हा सिनेमा हिट ठरणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 

बॉक्स ऑफिस इंडिया वेबसाइटनुसार, 'बाला'ने सोमवारी जवळपास आठ करोड रुपयाची कमाई केली आहे. शुक्रवारी या सिनेमाने 10.15 करोड रुपये, शनिवारी 15.73 करोड रुपये तर रविवारी या सिनेमाने 18.07 करोड रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने एकूण 51 रुपयांची कमाई केली आहे. 

महत्वाचं म्हणजे या सिनेमाचं बजेट 25 करोड रुपये होते. आणि अगदी दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने आपल्या बजेटचे पैसे पूर्ण केले आहेत. या सिनेमात आयुष्मानने बालमुकुंद शुक्लाचं पात्र साकारत आहे. 

'बाला' सिनेमातून आम्ही खूप चांगला आणि मजबूत सामाजिक संदेश दिल्याचं आयुष्मान खुराना सांगतो. मला आनंद आहे की, प्रेक्षकांना हा सिनेमा इतका आवडला. मला आशा आहे, हा सिनेमा भारतभर प्रेक्षकांना पसंत पडेल,' असं आयुष्मानने सांगितलं आहे.