मेलबर्न चित्रपट महोत्सवात 'अंधाधुन'ची एन्ट्री

ब्लॉकबस्टर 'अंधाधुन' चित्रपटाची मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी निवड

Updated: Jul 6, 2019, 07:18 PM IST
मेलबर्न चित्रपट महोत्सवात 'अंधाधुन'ची एन्ट्री title=

मुंबई : भारतात जबरदस्त कमाई केल्यानंतर आता श्रीराम राघवन दिग्दर्शित ब्लॉकबस्टर 'अंधाधुन' चित्रपटाची मेलबर्नमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी (आयएफएफएम) निवड करण्यात आली आहे. 'अंधाधुन'मध्ये आयुषमान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबरला 'अंधाधुन' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.

१०व्या मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी दिग्दर्शक राघवन यांच्यासह तब्बूदेखील हजेरी लावणार आहे. ते ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांसोबत चित्रपटाबाबत बातचीतही करणार आहेत.

मेलर्बनमध्ये होणाऱ्या या भारतीय चित्रपट महोत्सवासाठी दिग्दर्शक राघवन उत्साही असून त्यांनी याबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'अंधाधुन आमच्यासाठी अतिशय रोमांचक प्रवास ठरला आहे आणि आता चित्रपटाची मेलबर्न चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. ऑस्ट्रेलियातील भारतीय चित्रपटांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी उत्साही असल्याचं' त्यांनी म्हटलंय.

मेलबर्नमध्ये होणारा हा भारतीय चित्रपट महोत्सव ८ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या चित्रपट महोत्सवासाठी शाहरुख खान प्रमुख अतिथि म्हणून हजेरी लावणार आहे.

'अंधाधुन'मध्ये आयुषमान खुरानाने तो आंधळा असल्याचं, नाटक करत असल्याची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या तयारीसाठी आयुषमानने ३ महिन्यांपर्यंत दिव्यांगांच्या शाळेत जाऊन याबाबत अधिक माहिती जाणून घेतली होती. वेगळंच कथानक असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. भारतातील बॉक्स ऑफिसवरच नाही तर चीनमध्येही 'अंधाधुन'ने जबरदस्त कमाई केली. चीनमध्ये प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने १५० कोटींचा गल्ला जमवला होता.