'आता तरी देवा मला पावशील का' गाण्याचे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

गणपतीच्या काळात एक संस्कार करणारे गीतकार 

Updated: Apr 26, 2021, 12:58 PM IST
'आता तरी देवा मला पावशील का' गाण्याचे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन  title=

मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की आठवतं ते 'आता तरी देवा मला पावशील का' आणि 'तूच सुखकर्ता, तू दुःखहर्ता' ही दोन गाणी. या गाण्यांनी अख्खा पिढीला गावचा, गणपतीचा लळा लावला आहे. या प्रसिद्ध गाण्यांचे गीतकार हरेंद्र जाधव यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं आहे. (Ata Tari Deva Mala Pavshil ka Song Writer, lyricist Harendra Jadhav Passed Away ) सानपाडा येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. 

काही वर्षांपासून हरेंद्र जाधव हे पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे ते अंथरूणावरच होते. अखेर प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हरेंद्र जाधव यांनी भावगीत, भक्ती गीतातून प्रबोधन करणारे कवी म्हणून त्यांची ख्याती होती. 

त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी तारका जाधव, पत्नी , जावई व नात असा परिवार आहे. लोककवी हरेंद्र जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतून तसेच सानपाडा परिसरात सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला आहे. जाधव हे पेशाने शिक्षक होते. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. 

आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का? या गाण्यांमधून त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे. तसेच लावणीसारखे काव्य लिखाणासाठी त्यांनी हाताळली, त्यापैकीच माझ्या नवऱ्याने सोडलीया दारु बाय देव पावलाय गो, डोलकरा माझे डोलकरा, या सारखी कोळीगीते आजही श्रोते आवडीने ऐकतात.

10 हजाराहून अधिक गाणी हरेंद्र जाधव यांनी लिहिली आहेत. तसेच अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवाल, बेला सुलाखे, साधना सगरमपर्यंत अनेक गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत.