Ashok Saraf and Nivedita Saraf Love Story: अशोक सराफ हे अभिनयातले देव आहेत. गेल्यावर्षी त्यांचा 75 वा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा ते दोघंही आपल्या नात्याबद्दल बोलताना दिसतात. 27 जून रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. अशोक सराफ यांनीही अनेकदा आपल्या आणि निवेदिता सराफांच्या नात्यावर गोड भाष्य केले आहे. त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या आणि निवेदिता सराफांच्या नात्यावर भाष्य केले होते. ज्यात त्यांनी तो किस्सा सांगितला होता जेव्हा निवेदिता सराफांवरील प्रेमाची जाणीव त्यांना झाली होती. सध्या त्यांच्या या किस्स्याची बरीच चर्चा रंगलेली दिसते आहे. तुम्हाला माहितीये का की तो किस्सा नक्की काय होता?
प्रेक्षकांनी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यावर चांगलाच कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही पाहायला आवडते. त्या दोघांच्या वयामध्ये साधारण 18 वर्षांचे अंतर आहे परंतु त्यांच्या प्रेमकहाणीत मात्र या वयामुळे काहीच आड आले नाही आणि त्यांनी कधीही ते त्यांच्या चाहत्यांना दाखवूही दिले नाही.
निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची भेट ही नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. तेव्हा निवेदिता सराफ यांचे वडील हे अशोक सराफांचे मित्र होते. तेव्हा निवेदिता यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख अशोक सराफ यांच्यासोबत करून दिली होती. एका मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले की, ''मी 1988 मध्ये 'मामला पोरींचा' हा चित्रपट करत होतो. त्या चित्रपटात माझ्यासोबत निवेदिताही होती. या चित्रपटात निवेदिताचे पॅकअप झाले आणि मग ती मला भेटली आणि सहज म्हणाली की पुन्हा भेटू, बाय. खरंतर तिच्या बायनं मला फार वाईट वाटलं होतं. पण मी ते माझ्या चेहऱ्यावर कुठेही येऊ दिलं नाही. त्यावेळी ती दरवाज्यातून बाहेर पडताना सहज माझ्या मनात आलं की समोर असेलल्या दाराजवळ गेल्यानंतर आपल्याकडे नक्की वळून बघणार आणि तसंच झालं''
हेही वाचा - 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या मराठमोळ्या दिग्दर्शकाबद्दल तुम्हाला माहितीये का?
त्यानंतर ते म्हणाले की, ''त्यावेळी मला खात्री पटली की आमच्यात काहीतरी आहे.'' असा एक गोड किस्सा अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितला होता. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु निवेदिता यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते. अशोक सराफ म्हणाले की, ''आपल्या मुलीनं चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी निवेदिताच्या आईची इच्छा होती.'' त्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध झाला. त्या दोघांनीही गोव्यातील मंगेशी मंदिरात जाऊन साधेपणानं लग्न केले. निवेदिता सराफ यांनी आपल्या मुलाकडे जास्त लक्ष दिले आणि मग त्यांनी करिअरमधून ब्रेक घेतला. परंतु 'अग्गंबाई सासूबाई' या मराठी सिरियलापासून त्यांच्या करिअरची नवी इनिंग सुरू झाली आणि आता त्या मराठी टेलिव्हिजनवर सक्रिय आहेत.