कन्हैया कुमारांचं समर्थन करणाऱ्या शबाना आझमींवर नेटकऱ्यांनी डागली तोफ

शबाना आझमी अनेकांच्या निशाण्यावर आल्या आहेत 

Updated: Apr 2, 2019, 10:28 AM IST
कन्हैया कुमारांचं समर्थन करणाऱ्या शबाना आझमींवर नेटकऱ्यांनी डागली तोफ  title=

मुंबई : Loksabha Elections 2019 आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कलाकार मंडळीही काही नेत्यांना, पक्षांना किंवा एकंदरच लोकशाहीचा जागर असणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेला पाठिंबा देताना दिसत आहेत. पण, काही कलाकारांना मात्र त्यांची ठाम मतं मांडणं अडचणीत आणत आहे ज्या कारणास्तव कलाकारांना अनेकांच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी सध्या अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत. 

लाल सलाम नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्हैया कुमार यांना पाठिंबा दिल्याप्रकरणी आझमी यांच्यावर सोशल मीडियावर अनेकांनीच आगपाखड केली. कन्हैयाच्या प्रशंसनार्थ काही शब्द लिहीत त्याला एक खरी लढाई लढण्यास सांगणाऱ्या शबाना आझमी यांना काही नेटकऱ्यांनी तर पाकिस्तानमध्ये जाण्याचाही सल्ला दिला आहे. देशाचे तुकडे करु इच्छिणाऱ्यांच्या चित्रपटांसाठी अथे पैसे खर्च केले जातात, अशी खंत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली. 

आझमी यांना होणारा हा विरोध इतक्यावरच मावळला नाही. 'ज्या देशाने या कलाकारांना डोक्यावर घेतलं, त्यांचीच कबर खोदणाऱ्यांची साथ देणारी ही मंडळी उपकार विसरणाऱ्य़ांपैकीच एक आहेत', असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे परखडपणे आपली मत मांडणाऱ्या शबाना आझमी या अनेकांच्या निशाण्यावर आल्या आहेत असंच म्हणावं लागेल. शिवाय आता या विरोधावर त्यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं आहे. 

फक्त आझमीच नव्हे तर, अभिनेत्री स्वरा भास्करनेही कन्हैया कुमार यांना पाठिंबा दिला होता. अगदी महत्त्वाचे आणि अचूक मुद्दे मांडत त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं असून, लोकसभा निवडणुकीसाठी ते योग्य उमेदवार आहेत. मुख्य म्हणजे संसदेत अशा अनेक व्यक्तींची गरज आहे, असं ट्विट स्वराने केलं होतं. राजकीय पटलावर होणाऱ्या हालचाली आणि त्याला कला विश्वातून अशा प्रकारे मिळणारी साथ पाहता आगामी निवडणूकांविषयीचं वातावरण खऱ्या अर्थाने तापत आहे, असं म्हणायला हरकत नाही.