मुंबई : Aryan Khan gets bail : ड्रग्ज केस प्रकरणी मागील 25 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे.
सलग तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यादरम्यान विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला.
ड्रग्ज केस प्रकरणी कोठडीत असणाऱ्या तिघांच्याही सुटकेचे आदेश शुक्रवारी किंवा शनिवारी मिळणार असून तेव्हाच ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती बचावपक्षाच्या वकिलांनी दिली.
Bombay High Court grants bail to Aryan Khan in drugs-on-cruise case pic.twitter.com/MerVWcfpYZ
— ANI (@ANI) October 28, 2021
एनसीबीनं, सदर प्रकरण हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा युक्तिवाद केला होता. पण, अखेर आर्यन खानसह इतर दोघांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान सदर प्रकरणी आता एनसीबी पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. तूर्तास शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला असून, आता त्याच्या मुलाची म्हणजेच आर्यन खानची दिवाळी मन्नतवरच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
आरोपींकडे असणारे ड्रग्ज आणि कटकारस्थान या मुद्द्यांवर एनसीबीला युक्तिवाद करता आला नाही. ज्या धर्तीवर आर्यनचा जामीन मंजूर झाला.
शेवटच्या टप्प्यामध्ये माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आपला युक्तीवाद मांडत हे कटकारस्थान कसं, जेव्हा आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, ड्रग्जची कमर्शिअल क्वांटीटी पाच-सहा जणांना मिळून दाखवण्यात आली होती.
पण, यातला कोणीच एकमेकांना ओळखत नव्हता मग हे कटकारस्थान कसं असा प्रश्न आर्यनच्या वकिलांनी मांडला होता. ज्यानंतर न्यायाधीशांचं समाधान झालं आणि त्यांनी Allowed या एका शब्दात आर्यनचा जामीन मंजूर केला.
आर्यन आणि त्याच्यासोबत ताब्यात असणाऱ्यांविरोधात एनसीबीला कोणताही तगडा पुरावा सादर करता आला नाही. युक्तिवादातही हाच मुद्दा परावर्तित झाला, ज्यामुळं मुकुल रोहतगी यांनी एनसीबीच्या याच युक्तिवादाला अधोरेखित करत प्रतिप्रश्न उपस्थित केले आणि हे प्रकरण निकाली काढण्यासाठी आपलं कसब पणाला लावलं.