Anurag Kashyap On Rift With Famous Actor: दिग्दर्शक म्हणून आपल्या कलाकृतींमुळे चर्चेत असलेला अनुराग कश्यप सध्या त्याच्या अभिनयासाठी चर्चेत असून निमित्त आहे 'बॅड कॉप' या चित्रपटाचं. सध्या अनुराग या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. तो यासाठी अनेक मुलाखती देत असून यामध्ये पहिल्यांदाच त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे. अशाच एका खुलाशामध्ये अनुरागने अभिनेता अभय देओल आणि पंकज झा यांच्याबरोबर असलेल्या मतभेदांबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेता पंकज झा यांच्याबरोबरचे मतभेद हे पूर्णपणे गैरसमजामुळे झाल्याचं म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे अभिनेता अभय देओलसंदर्भात बोलताना अनुरागने सूचक विधान केलं आहे. "मी खरं बोललो तर तो कुठे तोंड दाखवण्यास लायक राहणार नाही," असं अभयबद्दल बोलताना अनुरागने म्हटलं आहे.
चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री असलेल्या जेनिस सिक्वेराला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुरागने नातेसंबंध संभाळण्यात तो किती वाईट आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे. यासंदर्भात बोलताना अनुरागने, "मी नाती संभाळण्यात फार वाईट आहे असं नाही. मी अभयला देव डीच्या शुटींगनंतर अद्याप भेटलेलो नाही. तो चित्रपटाच्या प्रमोशनलाही आला नाही. त्यानंतर तो माझ्याशी कधीच बोलला नाही. त्याला मला टॉक्सिक म्हणायचं असेल तर हरकत नाही. त्याने त्याची बाजू मांडली. मात्र सत्य मी सांगू शकत नाही, कारण मी खरं बोललो तर त्याला त्याचा चेहरा दाखवता येणार नाही," असं म्हटलं.
पुढे बोलताना, "बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल बोलण्याची हिंमत अभय करणार नाही. त्या साऱ्या खऱ्या गोष्टी आहे. तसेच मी या गोष्टींबद्दल बोलणार नाही कारण त्यामुळे तो XXXX वाटेल," अशा शब्दांमध्ये अनुरागने अभयबद्दल भाष्य केलं.
अनुरागला त्याच्याबरोबर काम करणारे अनेकजण अडचणी निर्माण करणार माणूस किंवा टॉक्सिक असं म्हणतात, या प्रश्नालाही अनुरागने उत्तर दिलं. "मी लोकांना कायम समाधानी नाही ठेऊ शकतं. मला जे लोक अडचणीचे वाटतात त्यांच्याबरोबर काम करत नाही. ज्यांना मी अडचण निर्माण करणारा वाटतो त्यांच्याबरोबर मी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळेच ते मला अडचण निर्माण करणारा म्हणत असावेत," असा टोला अनुरागने लगावला.
अनुराग आणि अभय देओलने 2009 साली प्रदर्शित झालेल्या डेव्ह डी चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाने तिकीटबारीवर उत्तम कामगिरी केली नसली तरी क्रिटीक्सकडून त्याचं फार कौतुक झालं होतं. आता अभय बद्दलचं असं कोणतं गुपित अनुरागला ठाऊक आहे हे तो किंवा अभयचं सांगू शकतो हे ही तितकेच खरे.