How did Matthew Perry die: फ्रेंड्स या सीरीजमुळं घराघरात लोकप्रिय झालेले चँडलर बिंग म्हणजेच मॅथ्यू पेरी यांचे रविवारी निधन झाले. मॅथ्यू यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 54व्या वर्षी बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मॅथ्यू यांच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. काही जणांच्या मते मॅथ्यू पेरी हे नशेच्या आहारी गेल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, पोलिसांनी मैथ्यूच्या घराची चौकशी केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकाचे अंमली पदार्थ सापडले नाहीयेत. मात्र, एका वेगळ्याच प्रकारची औषधं यावेळी पोलिसांना सापडली आहेत.
एका वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्यांनी मॅथ्यू पेरीच्या घरात डिप्रेशन, तणाव आणि एक सीओपीडीची औषधे सापडली आहेत. COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आणि हे औषध क्रॉनिक ब्रॉन्कायटिसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी वापरले जाते. हे औषध सापडल्यामुळं मॅथ्यू पेरी यांच्या धुम्रपानाच्या सवयीकडे इशारा करते. रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, मॅथ्यू खरंच या औषधांचे सेवन करत होते का हे तपासले जाईल. मात्र, या प्रक्रियेसाठी काही महिने जाऊ शकतात.
दरम्यान, मॅथ्यू यानी त्यांच्या पुस्तकात नशेच्या आहारी गेल्याचे आणि कॅलिफोर्नियातील एका घरात शांततेत आयुष्य व्यतित करायचे आहे, असं लिहिलं होतं. 'मी माझे अर्धे आयुष्य कुठल्यातरी दवाखान्यात किंवा शांत ठिकाणी व्यतित केले यात काहीच आश्चर्य नाही. तुम्ही चोवीस वर्षांचे असताना हे ठीक आहे, तुम्ही बेचाळीस वर्षांचे असताना मात्र हे योग्य असू शकत नाही. आता मी एकोणतीस वर्षांचा होतो, तरीही हे ओझं माझ्या पाठीवरून उतरवण्यासाठी धडपडत होतो, असं मॅथ्यू यांनी म्हटलं होतं.
मॅथ्यू पेरीची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट हा हॉट टबमध्ये आराम करतानाचा फोटो होता. त्यांचा मृत्यू होण्याच्या एक आठवडा आधी 23 ऑक्टोबर रोजी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. मॅथ्यू हेडफोन लावून बाथटबमध्ये बसलेला दिसला आणि चित्राला कॅप्शन दिले होते.
एका वृत्तसंस्थेनुसार, शनिवारी दुपारी मॅथ्यू पेरी यांचा बाथटबच्या जवळ मृतदेह आढळला होता. तो पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये आपल्या घराच्या जवळ असलेल्या रिवेरामध्ये 2 तास पिकलबॉल खेळून झाल्यानंतर घरी परतले होते. त्यानंतर लगेचच त्यांच्या मृत्यूची बातमी आली.