मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सामान्य जनतेपासून मोठ्या सेलिब्रिटिंना देखील कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. आता बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द थत्ते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची माहिती दिली आहे.
फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी मला कोरोना झाला आहे असं सांगितलं आहे. 'मला कोरोना झाला आहे. गेले दोन महिने साठ दिवस कोरोना होईल या भीतीने मी वर्क फ्रॉम होम करत होतो. पण व्हायचं तेच झालं. मला कोरोनाची लागण झाली आहे.' असं म्हणत त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, 'कोरोना झाल्यामुळे माझ्या मनात कोरोना विषयी असलेली भीती नष्ट झाली आहे. आता मी कोरोनाच्या आमने-सामने उभा आहे.' असं देखील ते म्हणाले. त्याचप्रमाणे कोरोनावर मात केल्यानंतर अनिल थत्ते यांनी प्लाझ्मा देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.