अंगाईगीत" येतोय १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

गणिताचे प्राध्यापक असलेल्या नरसिंह पनथुला यांनी दिग्दर्शित केलेला 'अंगाईगीत" हा चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 29, 2018, 04:28 PM IST
अंगाईगीत" येतोय १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : गणिताचे प्राध्यापक असलेल्या नरसिंह पनथुला यांनी दिग्दर्शित केलेला 'अंगाईगीत" हा चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अतिशय महत्त्वाचा असा सामाजिक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. मर्क्युरी मूव्हिस इंटर नॅशनल च्या अरुण कुमार मुळे यांची निर्मिती असून चंद्रशेखर रायावरं यांची प्रस्तुती आहे. पनथुला हे मूळचे तिरुपती जवळच्या चित्तूरचे. ते आयआयटीजेईईच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत होते. स्टीवन स्पिलबर्गचा शिंडलर्स लिस्ट आणि बरेच इराणी चित्रपट पाहून प्रभावित झाल्यानंतर त्यांना चित्रपट माध्यमाविषयी ओढ वाटू लागली.

स्वत: चित्रपट करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्यांनी काही शॉर्टफिल्म्स दिग्दर्शित केल्या. दरम्यान, एका पेपरमध्ये त्यांच्या वाचनात एक बातमी आली. त्या बातमीनं त्यांना धक्का बसलाच; त्यात विलक्षण नाट्य असल्याचंही लक्षात आलं. त्या बातमीवर आधारित चित्रपट करण्याचं त्यांनी ठरवलं. त्या बातमीची पार्श्वभूमी महाराष्ट्रातली होती. मराठी चित्रपटांची आशयसंपन्न पार्श्वभूमी लक्षात घेत पनथुला यांनी आपल्या मातृभाषेत, तेलुगूमध्ये चित्रपट न करता मराठीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी अभ्यास करून पटकथा लिहिली. श्वासकार संदीप सावंत यांच्याशी संपर्क साधून त्यांचंही मार्गदर्शन घेतलं. 

भिकाजी, अनुसया आणि सिद्धू या कुटुंबाची कथा या चित्रपटात आहे. या कथानकाला ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी आहे. एक वेगळा असा सामाजिक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. चित्रपटात अरूण नलावडे, अभय खडपकर, नीता दोंदे, प्रतीक्षा साबळे, राज बने यांच्या भूमिका आहेत. 

'चित्रपट हे अत्यंत सकस आणि प्रभावी असं माध्यम आहे. त्यामुळे चित्रपटातून काही वेगळे विषय हाताळून मानवी भावना, नातेसंबंध, सामाजिक समस्यांवर भाष्य करता येतं. अंगाई गीत हा चित्रपटही महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून काही वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ आणि जाणकार आहेत. त्यांना आशयसंपन्न कथानकं चित्रपटातून पहायला आवडतात. त्यामुळे त्यांना अंगाई गीत हा आमचा प्रयत्नही नक्कीच आवडेल,' असं नरसिंह पनथुला यांनी सांगितलं.