उद्योजक आनंद महिंद्रा यांनी अखेर '12th Fail' चित्रपट पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर इतरांप्रमाणे तेदेखील भारावले आहेत. एक्सवर त्यांनी भली मोठी पोस्ट लिहून चित्रपटाचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या फॉलोअर्सना जर तुम्ही यावर्षी एकच चित्रपट पाहणार असाल, तर तो हा असावा असं सुचवलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चित्रपटात मध्यवर्ती भूमिका निभावणाऱ्या विक्रांत मेस्सीनेही प्रतिक्रिया दिली आहे. विक्रांत मेस्सीने चित्रपटात आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका निभावली आहे.
12th Fail चित्रपट परिस्थितीशी झगडत आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात त्यांचा संघर्ष उलगडण्यात आला आहे. आनंद महिंद्रा यांनी चित्रपटाच्या कथेचं कौतुक केलं असून अभिनय आणि ज्याप्रकारे गोष्ट सांगण्यात आली आहे त्यांचीही स्तुती केली आहे. यावेळी त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना आणखी असे चित्रपट तयार करण्याचं आवाहन केलं आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना आनंद महिंद्रा यांनी सांगितलं की, "केवळ नायकच नाही, तर लाखो तरुण, यशासाठी भुकेले आहेत, जे जगातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक ठरलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विलक्षण अडचणींशी संघर्ष करतात."
चित्रपटाच्या कास्टिंगबद्दलही त्यांनी विधू विनोद चोप्रा यांचं कौतुक केलं आणि सांगितलं की भूमिकेतील प्रत्येक पात्र विश्वासार्ह आहे. यावेळी त्यांनी विक्रांत मेस्सीचं विशेष कौतुक केलं आहे. त्याने अतिशय जबरदस्त अभिनय केल्याचं सांगताना आनंद महिंद्रा यांनी हा राष्ट्रीय पुरस्काराच्या दर्जाचा असल्याचं म्हटलं आहे. "विक्रांत फक्त अभिनय करत नव्हता, तर तो ते जगत होता," अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत.
चित्रपटाच्या वर्णनात्मक शैलीबद्दल बोलताना आनंद महिंद्रा यांनी विधू विनोद चोप्रा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त महान सिनेमा महान कथांवर आधारित असतो याची आठवण त्यांनी करुन दिली . "चांगल्या प्रकारे सांगितलेल्या कथेचा साधेपणा आणि सत्यता यांची तुलना स्पेशल इफेक्ट्सही होऊ शकत नाही," असं आनंद महिंद्रा म्हणाले.
आनंद महिंद्रा यांनी यावेळी मध्यांतर आपल्यासाठी मुख्य सीन होता असं सांगितलं आहे. यातून नवा भारत उभारण्यासाठी काय करण्याची गरज आहे याची प्रेरणा मिळाल्याचं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. या पोस्टला 8 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिलं असून, त्यावर कमेंट्स केल्या आहेत. यातील अनेक कमेंट्स सकारात्मक आहेत.
विक्रांत मेस्सीनेही आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत आभार मानले आहेत. "धन्यवाद मिस्टर महिंद्रा. तुम्ही आमच्या प्रयत्नांचं कौतुक करणं आणि चित्रपटाची शिफारस करणं हे आमच्यासाठी सर्वकाही आहे. मला खात्री आहे की आमच्या टीममधील प्रत्येक सदस्य तितकाच उत्साही असेल.तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात. आम्ही योग्य काम केलं आहे याची ही पावती आहे. पुन्हा धन्यवाद," असं विक्रांत मेस्सीने लिहिलं.