प्रशांत अनासपुरे, झी २४ तास मुंबई : महाराष्ट्रात अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती होते मात्र अमेरिकेमध्ये अमेरिकन कलाकारांना घेऊन मराठी चित्रपटाचं निर्माती करण्यात आली आहे. लॉस एन्जेलिस, न्यूयॉर्क आणि युरोपमधील चित्रपट महोत्सवांमध्य़े १४ पुरस्काराचा मानकरी ठरलेला हा चित्रपट २९ जूनला अमेरिकेत प्रदर्शित होतं आहे.
अमेरिकेत आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाले आहेत. मात्र अमेरिकेमधीलच कलाकारांना घेऊन तेथेच चित्रीकरण करुन अमेरिकेतच आता मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं नावं आहे 'डीएनए'. आशय जावडेकर यांनी या चित्रपटाचं लेखन- दिग्दर्शन केलं आहे. तर, मकरंद भावे आणि दीपाली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अमेरिकेमध्ये स्थायिक असलेले काही भारतीय कलाकार आणि काही चक्क अमेरिकन कलाकारांना घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. गेल वॅग्नर यांच्यासह अनेक अमेरिकन कलाकार यात झळकत आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण अवघ्या २३ दिवसांमध्ये करण्यात आलं आहे.
चित्रपटातील बहुतांश कलाकार हे नोकरी करत असल्यामुळे सलग सुट्टी मिळवण्यासाठी त्यांना बरीच धड़पड करावी लागली होती. त्यामुळे मिळालेल्या सुट्टीतच त्यांना हे चित्रीकरण पूर्ण करावं लागलं. प्राजक्ता करंदीकर, मानसी बेडेकर, ऋषीकेश साने, अशा अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठीजनांनी हा चित्रपट साकारला आहे. परदेशात मराठी चित्रपट करण्याचा आनंद आणि एक वेगळं समाधान या सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
सातासमुद्रापार स्थायिक होऊनही मायमराठीचा जिव्हाळा आणि मराठीशी असलेलं नातं..टिकवून ठेवणाऱ्या या मनस्वी कलाकारांचा चित्रपट निर्मीतीचा हा सिलसिला असाचं सुरु राहो..याच Zee24Tass कडून शुभेच्छा..!