'अमूल'च्या बाहुलीचा रॅप, 'अपना टाईम है... खायेगा!'

'गली बॉय' या चित्रपटाचं यश साजरा करत एक सुरेख असं कार्टून साकारण्यात आलं आहे. 

Updated: Feb 19, 2019, 09:21 AM IST
'अमूल'च्या बाहुलीचा रॅप, 'अपना टाईम है... खायेगा!' title=

 मुंबई : रणवीर सिंगचा रॅपर अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला असून, त्याच्या या रुपाची आणि 'गली बॉय' या चित्रपटाची अनेकांनाच भुरळ पडली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्याविषयी प्रचंड कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळालं. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रणवीरच्या कारकिर्दीला एक नवं वळण देऊन गेला. 'अपना टाईम आयेगा' असं म्हणत प्रत्येकजण या चित्रपटाला दाद देत असताना 'अमूल'ही यात मागे राहिलेलं नाही. 

विविधरंगी आणि बहुचर्चित विषयांना हाताळत त्यावर तितक्याच कलात्मकचेते आणि अर्थातच चवीने भाष्य करणारे कार्टून साकारत 'अमूल' नेहमीच सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित आणतं. यावेळीसुद्धा त्यांनी अशीच काहीशी कामगिरी केली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड दाद मिळवत आहे. #Amul Topical या हॅशटॅगअंतर्गत 'अमूल'कडून यावेळी 'गली बॉय' या चित्रपटाचं यश साजरा करत एक सुरेख असं कार्टून साकारण्यात आलं आहे. 

ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या कार्टूनमध्ये 'अमूल'ची बाहुली ही आलियाच्या रुपात दिसत असून, ही 'सफिना' नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. त्याशिवाय रणवीर आणि सिद्धांच चतुर्वेदी यांच्या चित्रपटातील भूमिकांच्या आधारावरही यामध्ये कार्टून साकारण्यात आलं आहे. 'अपना टाईम है... खाएगा!' असं या नव्या पोस्टमध्ये ठळक अक्षरात लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे 'गली बॉय'ला मिळालेला हा चवदार टच काही औरच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईचे आकडेही दिवसागणिक वाढतच आहेत. मुंबईच्या गल्लीबोळात असणाऱ्या रॅपर्सच्या विश्वातून या चित्रपटाच्या निमित्ताने फेरफटका मारता येतो. स्वप्नांचा पाठलाग करत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत स्वप्नपूर्तीच्या दिशेने करणाऱ्या एका कलाकाराचा प्रवास 'गली बॉय'च्या निमित्ताने पाहायला मिळतो.