मुंबई: साधारण १९७६ सालातली घटना आहे. भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्या गाजवणाऱ्या बॉलोवूडचा पडदा अमिताभ बच्चन यांनी बऱ्यापैकी व्यापला होता. दरम्यान, सरकारने अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर केला. ही बातमी ऐकून अर्थातच संपूर्ण परिवाराला प्रचंड आनंद झाला. त्यामुळे या कार्यक्रमात संपूर्ण परिवार सहभागी व्हावा ही बच्चन कुटुंबियांची इच्छा. पण, सरकारी आदेश असा होता की, पुरस्कार मिळालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाती केवळ दोन व्यक्तीच कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार होत्या. परिवारातील समझोत्यानुसार असे ठरले की, अमिताभ बच्चन आणि त्यांचे बंधू अजिताभ बच्चन हे दोघे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. आता तुम्ही म्हणाल यात राजीव गांधींचा संबंध कुठे आला. त्यासाठी तुम्हाला पुढे वाचावे लागेल.
बच्चन कुटुंबियांनी ठरवल्यानुसार तिघेही काळ्या रंगाचा सूट परिधान करून कार्यक्रमात सहभागी होणार होते. त्यासाठी सूट शिवणारा खास टेलरही बोलावला. त्याने तिघांसाठी (हरिवंशराय, अमिताभ आणि अजिताभ) सूट शिवले. अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन यांच्यावर तिघांचे कपडे पॅक करण्याची जबाबदारी होती. पण, ज्या दिवशी पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जायचे होते नेमका त्याच दिवशी अजिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली. शेवटी अमिताभ आणि हरिवंशराय यांनीच कार्यक्रमाला जायचे ठरवले. त्यानुसार मंडळी दिल्लीला गेले. पण, कार्यक्रमस्थळी गेल्यावर कपडे घालून पाहिले तेव्हा मात्र, अमिताभ यांना धक्का बसला.
टेलरने अमिताभ बच्चन यांची पॅन्ट उंचीपेक्षा चक्क आर्ध्याफुटाने कमी शिवली होती. चौकशी केल्यावर कळले की, जया बच्चन यांनी कपडे भरताना अमिताभ ऐवजी अजिताभची पॅन्ट भरली होती. कार्यक्रम तर मोठा होता आणि इतक्या तातडीने कपडे उपलब्ध होणे तर मुळीच शक्य नव्हते. शेवटी अमिताभ बच्चन यांनी थेट आपले मित्र राजीव गांधी यांनाच फोन केला. तसेच, शक्य तितक्या लवकर कपडे पाठविण्याची विनंती केली. शेवटी राजीव गांधी यांनी आपला कुर्ता-पायजमा आणि शॉल पाठवून दिली. अमिताभ राजीव गांधी यांचे कपडे घालून कार्यक्रमात हजेरी लावली. अर्थात पूर्ण कार्यक्रमभर राजीव गांधी अमिताभ यांना विनोदाने छेडत राहीले की, आज तू माझे कपडे उधार घेतले आहेत.