OTT प्लॅटफॉर्मवरून 'पुष्पा' तुमच्या भेटीला; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकाल

जाणून घ्या ओटीटी रिलीजची तारीख 

Updated: Jan 6, 2022, 12:10 PM IST
OTT प्लॅटफॉर्मवरून 'पुष्पा' तुमच्या भेटीला; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकाल title=

मुंबई :  'पुष्पा: द राइज- पार्ट 1' हा चित्रपट प्रदर्शित झाल्याक्षणापासून त्यासंबंधातील प्रत्येक बातमी चर्चेचा भाग झाल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये धमाकेदार कामगिरी करत थक्क करणाऱ्या कमाईचा आकडा गाठणारा हा चित्रपट सध्या किमयागार ठरत आहे. (Pushpa) 

कोरोना काळातही या चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धी पाहता या चित्रपटाचे विविध पैलूही तितकीच लोकप्रियता मिळवून गेले. 

सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या मध्यवर्ती भूमिका पाहायला मिळत आहेत. 

विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कामगिरीनंतर आता निर्मात्यांनी तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

तेव्हा आता ज्यांना हा चित्रपट पाहता आलेला नाही, त्या सिनेरसिकांसाठी ही परवणी ठरणार आहे. 

कुठे आणि केव्हा रिलीज होणार चित्रपट ? 
7 जानेवारीला  'पुष्पा: द राइज- पार्ट 1' हा चित्रपट Amazon Prime या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. 

तामिळ, मल्याळम आणि कन्नड अशा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. 

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकवर्गाची गरज आणि तिथूनही मिळणारा प्रतिसाद पाहता यातूनही चित्रपटाला फायदाच होणार आहे. 

मुख्य म्हणजे हा फायदा किती प्रमाणात होतो आणि त्याचं कमाईच्या आकड्यात कितपत रुपांतर होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

चित्रपट का ठरतोय इतका लोकप्रिय ? 
अल्लू अर्जुननं या चित्रपटामध्ये साकारलेली भूमिका आणि त्याला मिळालेली तगड्या कथानकाची जोड ही 'पुष्पा'च्या जमेची बाजू ठरत आहे. 

एक अभिनेता म्हणून अल्लू अर्जुननं या चित्रपटातून काही नवे प्रयोगही केले आहेत जे तो किती समृद्ध अभिनेता आहे याचीच प्रचिती देत आहेत. 

फक्त अल्लू अर्जुन नव्हे, तर रश्मिका आणि इतर सहकलाकारांनीही या चित्रपटामध्ये तितक्याच ताकदीनं त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका साकारल्या आहेत.