मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'रक्षा बंधन' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा ठेवल्या जात होत्या. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. दरम्यान, कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत अक्षय कुमारचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या निवेदनात अभिनेत्याने म्हटलं आहे की, एक वेळ अशी आली होती की, तो सर्व काही सोडून कॅनडाला परत जाणार होता.
भारताचं नागरिकत्व नाही
अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. भारताचं नाहीये. अशावेळी लोकं खिलाडी कुमारला कॅनडा कुमार म्हणत ट्रोल करत होते. अशात खिलाडी कुमारने अशी गोष्ट सांगितली की, त्याच्या चाहत्यांना धक्का बसेल.
जायचं होतं परत
एका मुलाखतीमध्ये बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, 'अनेक वर्षांपूर्वी माझे चित्रपट चालत नव्हते. जवळपास 14-15 चित्रपट फ्लॉप झाले. मग मनात आलं की, कदाचित दुसरीकडे जाऊन काम करावे. त्यावेळी माझ्या एका मित्राने मला कॅनडाला शिफ्ट होण्याचा सल्ला दिला. माझा मित्रही कॅनडामध्ये राहत होता. तिथे बरेच लोकं कामासाठी जातात आणि ते अजूनही भारतीय आहे. मग मला वाटलं की इथे नशीब साथ देत नसेल तर मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. मग कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि मला तो मिळाला.
या मुलाखतीत अक्षय कुमार पुढे म्हणाला की, माझ्याकडे पासपोर्ट आहे. जो एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी असतो. मी एक भारतीय आहे माझे सर्व कर मी भरतो. मी तिथेही कर भरू शकतो पण मी माझ्याच देशात भरतो आणि माझ्याच देशात राहीन.