सुशांतमागोमाग आता CBI कडून दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सुरु

सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच ....

BGR | Updated: Sep 3, 2020, 02:14 PM IST
सुशांतमागोमाग आता CBI कडून दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सुरु  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर बऱ्याच संशयास्पद प्रश्नांनी डोकं वर काढलं असल्यामुळं अखेर सीबीआयनं या प्रकरणीचा तपास हाती घेतला. ज्यामध्ये तपासाअंतर्गत दर दिवशी नवी माहिती समोर येऊ लागली. या प्रकरणीचं तपास सत्र अद्यापही सुरुच आहे. असं असताना आता CBI नं एकेकाळी सुशांतची मॅनेजर म्हणऊन काम पाहणाऱ्या दिशा सालियन हिच्याही मृत्यूचा तपास हाती घेतल्याचं कळत आहे. 

सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच दिशानं इमारतीवरुन उडी मारून जीवन संपवलं होतं. दरम्यान, दिशाच्या मृत्यूचा तपास करतेवेळी सर्वप्रथम सीबीआयनं  Cornerstones Company चा मालक असणाऱ्या बंटी सचदेव याला चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे बोलावलं आहे. बंटी सचदेव हा अभिनेता सोहेल खान याच्या पत्नीचा भाऊ आहे. 

 Cornerstones Company ही एक सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी आहे. विराट कोहलीसारख्या आघाडीच्या क्रिकेटपटूपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं PR संबंधित काम या कंपनीकडून पाहिलं जातं. दिशा याच कंपनीत काम करत होती. मृत्यूपूर्वी ती सुशांतच्या एका चित्रपटाच्या PR चं कामही पाहत असल्याची माहिती समोर आली होती. 

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणीच्या तपासाला जोडूनच सीबीआय दिशाच्या मृत्यूची चौकशी करत असल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वीच दिशाच्या आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार दिशाचा फोन तिच्या मृत्यूनंतरही सुरु होता. एवढंच नाही तर, तिचा फोन फॉरेन्सिक टीमला तपासणीकरता पाठवण्यातही आला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार १७ जूनपर्यंत दिशाचा फोन सुरू होता.  तिच्या आत्महत्येची तपासणी देखील केली नव्हती. दिशाचा ऑटोप्सी रिपोर्ट देखील दोन दिवसानंतर करण्यात आला होता. ज्यानंतर तिच्या आत्महत्येबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले असल्याचं कळत आहे. तेव्हा आता सीबीआयला या प्रश्नांची उत्तरं गवसणार का आणि त्यातून कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.