रात्री उशिरा राणी पोलीस पेट्रोलिंग टीमच्या भेटीला

निर्भीड राणीचा 'मर्दानी' अंदाज

Updated: Dec 7, 2019, 02:32 PM IST
रात्री उशिरा राणी पोलीस पेट्रोलिंग टीमच्या भेटीला title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या आगामी 'मर्दानी २' चित्रपटाचे प्रमोशन करण्यात कोणत्याच प्रकारची कसर ठेवताना दिसत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक शक्कल लढवताना दिसत आहे. तर ती आता रात्री पोलिसांचे मनोबळ वाढवण्यासाठी मुंबईच्या पोलिसांना भेटत आहे. तिच्या या भेटीमागे कारण देखील तसंच आहे. चित्रपटात ती एका निर्भीड पोलिसाच्या भूमिकेत झळकत आहे. 

महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री सर्वत्र पोलीस पेट्रोलिंग करत असतात. पोलिसांच्या संपूर्ण टीमला भेटल्यानंतर राणी म्हणाली, 'पोलिसांची समाजात होणाऱ्या अपराधांवर करडी नजर असते. आपण रात्री जेव्हा गाढ झोपेत असतो, तेव्हा पोलीस सर्वत्र पेट्रोलिंग करत असतात.' असं म्हणत राणीने पोलिसांच्या कामाला सलाम केले. 

चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. ‘मर्दानी २’ चित्रपट 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 'यशराज फिल्म'च्या बॅनर खाली साकारण्यात येत असलेल्या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. 

‘मर्दानी २’चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरेण करणार आहेत. गोपी पुथरेण या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करणार आहेत. १३ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.