इंदिरा गांधींच्या रुपात दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?

 नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा प्रत्येक माध्यमातून इंदिरा गांधी आपल्या भेटीला आल्या.

Updated: Aug 4, 2021, 05:36 PM IST
इंदिरा गांधींच्या रुपात दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?  title=

मुंबई : स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचं नाव घेतलं जातं. इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीचा उल्लेख कायमच बहुविध कारणांनी केला जातो. भारतीय राजकारणामध्ये 'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाव प्रकाश टाकणाऱ्या अनेक भूमिका आजवर साकारल्या गेल्या. 

नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा प्रत्येक माध्यमातून इंदिरा गांधी आपल्या भेटीला आल्या. विविध अभिनेत्रींनी त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यातचं शिवधनुष्य पेललं. आता पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील एका घटनेवर भाष्य करणारं कथानक रसिकांच्या भेटीला येत आहे. निमित्त ठरतोय तो म्हणजे 'बेल बॉटम' हा चित्रपट. 

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. 1980 च्या दशकामध्ये घडलेल्या घटनांचा, प्रसंगांचा आधार घेत या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेची झलकही पाहायला मिळत आहे. ही व्यक्तिरेखा साकारली आहे मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या अभिनेत्री लारा दत्तानं. 

आपल्या वाट्याला आलेल्या या भूमिकेविषयी सांगताना काही आव्हानात्मक मुद्दे लारानं अधोरेखित केले. या भूमिकेसाठी खूप अभ्यास केला गेला. पण, ही मला मिळाललेली एक मोठी संधी असून, याची जाण आयुष्यभर राहील अशी भावना लारानं व्यक्त केली. 

इंदिरा गांधी यांच्या रुपात लाराला पाहून आणि तिनं साकारलेल्या भूमिकेची दमदार झलक पाहून नेटकऱ्यांनीही या अभिनेत्रीला शाबासकी दिली आहे. अनेकांनी तर, लाराचा कायापालट करणाऱ्या मेकअप आर्टिस्टचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.