मुंबई : जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाचाच असतो असं नाही. अनेकदा आनंदी आयुष्याला गालबोट लागावं अशा घटना घडतात आणि होत्याचं नव्हतं होतं. असंच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या आयुष्यातही घडलं. सर्वकाही सुरळीत होतं, नवं नवं लग्न होतं आणि त्याच वेळी तिला हादरा बसला.
हादऱ्यातून सावरणं कठीण होतं, पण अशक्य नव्हतं. अभिज्ञानं तेच ठरवलं आणि त्या मार्गानं ती निघाली. पती, मेहुल पै याला कॅन्सरची लागण झाल्याचं कळताच अभिज्ञाचं आयुष्य 360 अंशांनी फिरलं. (Cancer)
जाणारा दिवस जात होता, येणारी आव्हानं येत होती... पण अभिज्ञा मात्र नमली नाही आणि परिस्थितीपुढे तिनं मेहुललाही नमू दिलं नाही.
आव्हानाच्या या काळातही ही जोडी एकमेकांची ताकद होऊन समोर आली. म्हणूनच की काय तिथं मेहुल कॅन्सरच्या उपचारांतून जात असतानाच इथं त्याला अमर्याद सकारात्मकता देण्याचं काम अभिज्ञा करत आहे.
सोशल मीडियावर तिनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ट्रेंडमध्ये असणारं एक रिल या जोडीनं तयार केल्याचं पाहायला मिळालं. 'आम्ही थेरेपीच्या दिवसांकडे असे पाहतो.... ', असं कॅप्शन लिहित अभिज्ञानं पतीसोबत थोडा Time Pass केला.
घडणाऱ्या गोष्टी घडायच्याच. त्यासाठी काय जगणं सोडायचं... असाच संदेश जणू तिची ही पोस्ट देत आहे. रोजच्या जीवनातील घडमोडींनी आपण खचतो, पण जगण्याची उमेद खचू देऊ नका... अभिज्ञा सध्या नकळत हेच सर्वांना सांगतेय नाही का?