मुंबई : तुळशीचं लग्न झालं की लग्नांना खऱ्या अर्थाने सुरूवात होते.
दिवाळीनंतर मराठी सिनेसृष्टीत लग्न समारंभाना सुरूवात झाली. प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहित गुजर पाठोपाठ आणखी एक अभिनेता लग्न बोहल्यावर चढला आहे. अभिनेता विजय आंदळकर देखील विवाह बंधनात अडकला आहे.
विजयने अभिनेत्री पुजा पुरंदरे हिच्याशी गुरूवारी लग्न केले. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा साखरपुडा पार पडला होता. या दोघांना शेवटचं प्रार्थना बेहेरेच्या लग्न समारंभात एकत्र पाहिले होतं. यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत गुरुवारी विजयने पूजासह मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने विवाह केला.
या लग्नसोहळ्याला विजय आणि पूजाचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. हा विवाह सोहळा अगदी साधेपद्धतीने पार पडला. या सोहळ्यात पुजाचा अगदी सोज्वळ लूक पाहायला मिळाला. त्यांच्या या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
विजयने 'ढोल ताशे', 'मी अॅण्ड मिसेस सदाचारी', '702 दिक्षित' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तर पूजाने 'किती सांगायचय मला' या मराठी मालिकेत काम केले आहे.