मुंबई : ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आला. गणपती बाप्पा आपापल्या घरी आणि मंडळात विराजमान झाला आहे. प्रत्येकाच्या गणेशोत्सवाच्या दिवसातील खास आठवणी आहेत. प्रत्येकाची आपल्या गणपती बाप्पाबद्दलची ओढ वेगळी आहे. तसंच काहीस कलाकारांच असतं. अशाच बालपणातील खास आठवणी आणि एक गुपित अभिनेता शेखर फडकने शेअर केली आहे.
अभिनेता शेखर फडके सांगतो की, मी वयाने कितीही मोठा झालो तरी मी , बाप्पाच म्हणतो. हसतील बरेच जण , पण मी लहनांसारखा बाप्पाच म्हणेन. कारण मला मी अजून मोठा झालोय असं वाटतच नाही, ह्या गणपतीच्या सणाला. एक गुपित सांगतो आज,माझं पाळण्यातले नाव मोरेश्वर आहे .
माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात, गणेशोत्सवापासूनच झाली. आमच्या सोसायटीमध्ये पाच दिवसांचा गणपती असतो, स्टेज बांधलं जातं, त्या स्टेज वर मी आवर्जून भाग घ्यायचो लहानपणी, अनेक स्वगतं तिथे सादर केली, काही गंभीर आणि जास्त विनोदी. तिथेच मला खरा प्रेक्षक वर्ग मिळाला, आत्मविश्वास वाढला आणि ह्या क्षेत्रात येण्याचे निश्चित केले. नाटकाच्या निमित्ताने गणपती दिवसातले अनेक दौरे , अनेक ठिकाणी केले , जास्त करून गोवा. गणपतीचा दौरा असला म्हणजे खूप छान वाटायचं. अनेक ठिकाणाच्या बाप्पाचं दर्शन व्हायचं. प्रसाद खायला मिळायचा.
विघ्नहर्ता असल्यामुळे मी त्याच्याकडे सगळ्यांची दुःख दूर होवोत अशी प्रार्थना नेहमी करतो. माझ्या फडके घराण्याचा गणपती पूर्वी पेण ला असायचा . सगळी भावंडं जमायची आणि धमाल करायची. एकत्र गप्पा, गाणी, आणि होम मेड आईस्क्रीम ,वा वा. पण ते दिन गेले लवकर. सगळ्यात वाईट गोष्ट ही की , घराण्याचा बाप्पा विभागला जाणं,त्यासाठी मी बाप्पावर अजून रुसलो आहे. आता मी काकांकडे बाप्पा च्या दर्शनाला जातो. इतरांना त्रास होईल असं बाप्पाचा सण साजरा करू नये, एवढंच सांगेन..