'भुज- प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात शरद केळकरची वर्णी

अभिनेता राणा दग्गुबातीच्या जागी शरदची वर्णी लागली आहे.   

Updated: Jan 15, 2020, 01:06 PM IST
'भुज- प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात शरद केळकरची वर्णी title=

मुंबई : 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात अलेला अभिनेता शरद केळकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'तान्हाजी' चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर आता तो 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटामध्ये भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता राणा दग्गुबातीच्या   जागी शरद केळकरची वर्णी लागली आहे. 

मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार राणा दग्गुबातीने त्याच्या तब्येतीमुळे चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर निर्मात्यांनी त्याच्या जागी शरदच्या नावाला पसंदी दिली आहे. तान्हाजी चित्रपटामध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय दिल्यानंतर तो आता 'भुज' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. 

भुज चित्रपटामध्ये शरदला पुन्हा अभिनेता अजय देवगनसोबत भूमिका साकारता येणार असल्यामुळे तो फार खूश आहे. 'भुज हा चित्रपट ऍक्शनने परिपूर्ण असा चित्रपट आहे. दरम्यान राणाला पूर्ण स्थिर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.' असं वक्तव्य शरदने केलं आहे. 

राणाच्या आरोग्यामुळे अभिषेक यांनी मला चित्रपटाबद्दल विचारणा केली असल्याचे देखील त्याने सांगितले. अभिषेक दुधैया यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीति चोप्रा आणि एम्मी विर्क मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. गिन्नू खनूजा, वजिर सिंग, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अभिषेक दुधैया यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.