'मी काम करणं थांबवाव, यासाठी हा पुरस्कार दिलाय का?'

महानायक अमिताभ बच्चन यांचे वक्तव्य 

Updated: Dec 29, 2019, 06:23 PM IST
'मी काम करणं थांबवाव, यासाठी हा पुरस्कार दिलाय का?' title=

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. आपलं अभिनय कौशल्य, संवाद कौशल्य त्याचप्रमाणे नृत्यकौशल्यांने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बिग बींना आज दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जेव्हा त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सान्मानित करण्यात आला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांनी आपले मत प्रकट केले. 'दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं संकेत आहे की आता खुप काम केलं आता घरी बसून आराम करा. पण असं नाही अजून काम बाकी आहे.' असं म्हणत त्यांनी विनोदी अंगाने आपलं मत मांडले. 

म्हणजे बिग बी आणखी चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. यावेळी त्यांनी भारत सरकार आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार आणि प्रेक्षकांचे देखील आभार मानले.  

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार २३ डिसेंबर रोजी दिल्लीच्या विज्ञान भवनात प्रदान करण्यात येणार होता. परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहू शकले नव्हते. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

म्हणून, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २९ डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येईल अशी घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली होती. अखेर त्यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.