मुंबई: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन ओटीटीवर चांगलाच चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अभिषेक बच्चनच्या करिअरला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. अभिषेक बच्चन याचे शेवटचे पाच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. 2020 या वर्षी 'लूडो' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता 'दसवीं' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चित्रपटांच्या कमाईबाबत चर्चा रंगू लागली आहे. असं असताना अभिषेक बच्चनचा 'दसवीं' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे चित्रपट रसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र याबाबत कोणतंही दु:ख नसल्याचं अभिषेक बच्चन यांनी सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चन यांनी ओटीटीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
"मी एक अभिनेता आहे. माझे काम अभिनय करणे आहे. आम्हाला मोठ्या पडद्यावर काम करायला आवडते, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. पण मला असं वाटतंय की, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर असणे खूप फायदेशीर आहे. कारण ओटीटी प्लॅटफॉर्म सिनेमा हॉलपेक्षा अनेक लोकांपर्यंत पोहोचतो.", असं अभिषेक बच्चन यांनी सांगितलं.
"लुडो असो किंवा बिग बुल असो, हे चित्रपट खूप लोकांनी पाहिले आहेत. जर दसवीं या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट 400 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचेल. चित्रपटगृहात फक्त 10 टक्के लोकांना चित्रपट बघायला आवडला असता. म्हणजेच एकूण 40 दशलक्ष लोकांनी चित्रपटगृहात चित्रपट पाहिला असता. यानुसार तिकिटांची सरासरी काढायची झाली तर भारतात तिकीट दर सरासरी 120 रुपये आहे. सरते शेवटी हिशोब केला तर ओटीटीची आकडेवारी चांगली असेल.", असं अभिषेक बच्चन याने सांगितलं.
दुसरीकडे नंबर्स गेम अद्याप वेबवर अस्तित्वात नसल्याने अभिषेक बच्चन आनंद व्यक्त केला आहे. "ओटीटी प्लॅटफॉर्म्स कमाईची आकडेवारी प्रदर्शित करत नाही, हे किती चांगलं आहे. पण बॉक्स ऑफिसवरील आकडे वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. भले चित्रपट चांगला असो की नसो, चर्चा मात्र असायची", असंही त्याने पुढे सांगितलं.