शाळेतल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर प्रदर्शित

Aatmapamphlet Movie Trailer :  या चित्रपटातून तुम्हाला देखील तुमचे शाळेतील दिवस आणि त्यासोबत शाळेतलं पहिलं प्रेम नक्कीच आठवेल... चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 16, 2023, 06:10 PM IST
शाळेतल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर प्रदर्शित title=
(Photo Credit : Trailer ScreenGrab)

Aatmapamphlet Movie Trailer : अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी' आणि 'वाळवी' यासारख्या भन्नाट चित्रपट देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. त्यामुळे 'आत्मपॅम्फ्लेट' मध्येही प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की.

अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात आत्मपॅम्फ्लेटचा वर्ल्ड प्रीमियर झाला. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे सत्तर देशांमधल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कारही  या चित्रपटाला मिळाला.

'आत्मपॅम्फ्लेट'बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, 'आत्मचरित्र थोरामोठ्यांचीच असतात असा सर्वसाधारण नियम आहे, पण अत्यंत सामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असूच शकतं, आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं  हेच 'आत्मपॅम्फ्लेट' मधून मांडण्यात आले आहे. कोवळ्या वयातील ही वरकरणी एक प्रेमकथा वाटेल पण नक्कीच हा सिनेमा त्याहूनही बरच काही सांगण्याचा प्रयत्न करतो. यातील प्रत्येक पात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे आहे. प्रत्येकाला ही स्वतःचीच गोष्ट वाटेल. आपल्या आवडत्या काळाचा नॉस्टॅलजिया देणारा आणि प्रत्येक वयोगटासाठीचा हा चित्रपट असेल.'

हेही वाचा : भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रेग्नंसी फोटो शूट करणारी स्वरा भास्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज 'आत्मपॅम्फ्लेट'चे निर्माते आहेत. नावावरूनच काहीतरी हटके असणारा हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आतापर्यंत 'आत्मपॅम्फ्लेट'चा बर्लिन आणि आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड बरोबरच टिफ ज्युनिअर, 63 वा झ्लीन फिल्म फेस्टिवल ऑफ चेक रिपब्लिक, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, आयएफएफएसए टोरोंटो असा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास झाला आहे.