चीनमध्ये बाहुबली ठरला आमिरचा 'हा' चित्रपट!

वर्ष २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा चित्रपट सिक्रेट सुपरस्टार काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 2, 2018, 07:36 PM IST
चीनमध्ये बाहुबली ठरला आमिरचा 'हा' चित्रपट! title=

नवी दिल्ली : वर्ष २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा चित्रपट सिक्रेट सुपरस्टार काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. चीनमध्ये हा चित्रपट हिट ठरला आणि चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानच्या प्रोडक्शनने केली असून यात जायरा वसीम प्रमुख भूमिकेत आहे. तर आमिर देखील एका लहानशा भूमिकेत झळकला आहे. मात्र आमिरच्या या चित्रपटाने चीनमध्ये ५०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

५०९ कोटींहुन अधिक कमाई

ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार चित्रपटाने आतापर्यंत ५०९ कोटींहुन अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट भारतात गेल्या दिवाळीला प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र भारतात हा चित्रपट फारशी कमाल करू शकला नाही. सुमारे ६३ कोटींचा गल्ला भारतात करण्यात चित्रपटाला यश आले होते. मात्र चीनमध्ये कमाईच्या बाबतीत चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. इतकंच नाही तर सिक्रेट सुपरस्टार चीनमधील बाहुबली ठरत आहे. 

हे अगदी खरे आहे. कारण बाहुबली २ ने भारतात जितकी कमाई केली होती तितकीच कमाई चीनमध्ये सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाने केली आहे. कमाईत फक्त १ कोटी ९९ लाखांचा फरक आहे. बाहुबली २ ने भारतात ५१० कोटी ९९ लाखांची कमाई केली होती. मात्र चीनमध्ये सिक्रेट सुपरस्टारला मिळणार प्रतिसाद बघता याची कमाई अजूनही संपलेली नाही. चीन बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा जलवा सुरुच आहे.

बनवले हे ३ रेकॉर्ड

सिक्रेट सुपरस्टार हा चित्रपट चीनमध्ये पहिल्या दिवसापासून कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच चित्रपटाने चीनमध्ये प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांचा रेकॉर्ड तोडला आहे. यापूर्वी देखील आमिरचे 'पीके', '3 इडियट्स' आणि 'दंगल' हे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले होते. मात्र सिक्रेट सुपरस्टार पूर्वी हा रेकॉर्ड पीके चित्रपटाच्या नावावर होता. या चित्रपटाने १२७ कोटी कमावले होते. मात्र सिक्रेट सुपरस्टार हा रेकॉर्ड तीन दिवसातच तोडला.

या चित्रपटालाही टाकले मागे

सिक्रेट सुपरस्टारने आमिरच्या पूर्वीच्या ३ चित्रपटांबरोबरच हॉलिवूडच्या 'मेज रनर: द डेथ क्रू' या चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. यावरून चीनमध्ये आमिरची असलेली प्रसिद्धी दिसून येते आणि सिक्रेट सुपरस्टारने त्यात अधिक भर घातली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.