मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एका गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. आमिर खानने आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'करता तयारी सुरू केली आहे. १९९४ च्या हॉलिवूड सिनेमा 'फॉरेस्ट गम्प' (fORREST Gump) चा हा सिनेमा रिेमेक असणार आहे.
या अगोदर आमिर खानने सिनेमाकरता २० किलो वजन कमी केल्याचं ऐकलंच आहे. पात्राप्रमाणे आमिर खान आपल्या लूकमध्ये कायमच बदल करताना दिसला आहे. आता या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाकरता आमिर खान १०० वेगवेगळ्या आणि खऱ्या लोकेशनवर शूट करताना दिसणार आहे.
नुकताच आमिर खान पंजाबमध्ये भारत-पाक सीमा जवळच्या जंगलात शूटिंग करताना दिसला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाच्या स्क्रिप्टची मागणी पाहता आमिर खान वेगवेगळ्या शहरातील लोकेशन यामध्ये दाखवणार आहे.
स्टुडिओ सेट-अप करून सिनेमा चित्रित करण्यात आमिर खानला रस नाही त्यामुळे अगदी खऱ्याखुऱ्या १०० लोकेशनची निवड आमिर खानने केली आहे. यामध्ये दिल्ली, गुजरात, मुंबई, कोलकाता, बंगलुरू आणि हैद्राबाद सारख्या शहरांची निवड केली आहे. तसेच असे अनेक राज्य आहेत ज्याठिकाणी आमिर खान पहिल्यांदा शूट करणार आहे. या सिनेमाकरता संपूर्ण देश पालथ घालणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या सिनेमात आमिर खानचा रोल हा बालपणापासून ते अगदी वयाची पन्नाशीपर्यंतचा आहे. त्यामुळे या काळात त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आठवणी आहेत. भारतीय सिनेमांत पहिल्यांदाच १०० लोकेशनची निवड करण्यात आली आहे. याचं शुटिंग सुरू झालं असून ते पुढील दीड महिना चालणार आहे.