Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवरती झालेल्या लाठीचार्ज नंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभरात पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. सकाळपासूनच बीड शहरामध्ये रस्त्यांवरती शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झालेला आहे. प्रशासनाच्या वतीने सर्वांना शांततेचं आव्हान करण्यात आलेला आहे. तर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करत आहेत. या सगळ्यात आता छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
अश्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये अश्विनीनं म्हटलं आहे की 'मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?' अश्विनीनं केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिनं व्यक्त केलेल्या या संतापाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
हे आंदोलन 29 ऑगस्ट पासून सुरु झालं आहे. दोन वेळा झालेल्या चर्चेतूनही काही साध्य झालं नाही. पुढे पोलीस आणि आंदोलक यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यानंतर लाठीचार्जची घटना घडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी तुफान जाळपोळ केली. आंदोलकांनी 15 बसगाड्या जाळल्या. आंदोलकांच्या दगडफेकीत 5 अधिकारी आणि 32 पोलीस कर्मचारी जखमी झाले. रात्रीच्या तणावानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे. जाळलेली वाहनं पोलिसांनी दूर करून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सुरू केलाय. काल आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीमार केला. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. त्यांना रूग्णालयात नेण्यासाठी पोलीस गेले असता आंदोलकांनी त्यांना अडवलं आणि दगडफेक केली, त्यातून लाठीमार झाला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार या आंदोलनावर म्हणाले की पोलिसांकडून बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. पोलिसांच्या भूमिकेची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आंदोलकांना त्यांनी शांततेचं आवाहन केलंय.