लॉस एंजेलिस : यंदाच्या ऑस्कर पुरस्काराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता लॉस ऐंजेलिसमधील डॉल्बी थिएटरध्ये ऑस्करचा हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. शंभरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ऑस्करचं यंदाचं हे ९१वे वर्ष आहे. यंदा २०१९चा ऑस्कर पुरस्कार अनेक कारणांनी महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अनेक विवादास्पद होणार आहेत.
यंदाचा ऑस्कर कोणत्याही प्रकारच्या सुत्रसंचालकाविना पार पडणार आहे. सूत्रसंचालक नसल्यामुळे पुरस्कार देणाऱ्या कलाकारांवर लक्ष केंद्रित केलं जाणार असून ऑस्कर पुरस्कार प्रदान करणारे कलाकारच हा पुरस्कार सोहळा पुढे घेऊन जातील. ऑस्कर २०१९ अनेक नकारात्मक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'द ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ऍन्ड सायन्स'ने चार महत्त्वाचे पुरस्कार यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे अशा कार्यक्रमांना वेळेचंही बंधन घालण्यात आलं आहे. कार्यक्रमाची वेळ तीन तासांपुरता मर्यादित ठेवण्यात येणार आहे. ऑस्करमधून वगळण्यात आलेल्या चार विभागांमध्ये सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटींग, लाइव्ह ऍक्शन शॉर्ट, मेकअप त्याचप्रमाणे हेअर स्टाईलचा समावेश आहे. केविन हार्ट यंदाच्या ऑस्करचं सुत्रसंचालन करणार होता परंतु समलैंगिक संबंधाबद्दल केलेल्या विधानानंतर त्याने यातून माघार घेतली.
भारतीय प्रमाण वेळेनुसार सोमवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजल्यापासून ऑस्करचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. भारतात ऑस्करचं संपूर्ण थेट लाइव्ह प्रक्षेपण 'हॉट स्टार'वर पाहता येणार आहे. यंदाचा ऑस्कर रेड कार्पेट सोहळा ट्विटरच्या माध्यमातून २५ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजल्यापासून पाहता येणार आहे. ट्विटर @TheAcademy या हँडलवरून या लिंकवर क्लिक केल्यास https://twitter.com/theacademy ऑस्कर पुरस्कार पाहता येणार आहे. यंदा अनेक बदल करण्यात आलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.