काय करते कपिल देव यांची मुलगी, '`83' नंतरच का होतेय इतकी चर्चा ?

कपिल देव यांच्या घरातीलच एका व्यक्तीनंही महत्त्वाची भूमिका बजावली

Updated: Dec 30, 2021, 01:19 PM IST
काय करते कपिल देव यांची मुलगी, '`83' नंतरच का होतेय इतकी चर्चा ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दिग्दर्शक कबीर खान यानं साकारलेल्या '`83' या चित्रपटानं क्रीडारसिकांना क्रिकेटचं मैदान नव्हे, तर सिनेमागृहांकडे खेचत आणलं. अभिनेता रणवीर सिंग यानं या चित्रपटामध्ये भारता पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारली. 

मोठ्या पडद्यावर रणवीरनं ही भूमिका अशी काही साकारली, की आतापर्यंतची ही त्याची सर्वोत्तम कामगिरी मानली गेली. 

'`83' या चित्रपटामध्ये खुद्द कपिल देव यांचीही झलक दिसते. इतकंच नव्हे, तर माजी खेळाडू अमरनाथही झळकतात. 

कबीरच्या या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये कपिल देव यांच्या घरातीलच एका व्यक्तीनंही महत्त्वाची भूमिका बजावली. ही महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कपिल देव यांची मुलगी. 

अमिया देव असं तिचं नाव. कपिल आणि रोमी यांना लग्नानंतर 14 वर्षांनंतर अमियाच्या रुपात अपत्य झालं. 

गुरुग्राम येथून तिचं शालेय शिक्षण झालं. यानंतर युकेतील युनिवर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज इथून तिनं पुढील शिक्षण पूर्ण केलं. 

अमिया सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. तिचं इन्स्टा आणि फेसबुक अकाऊंटही प्रायव्हेट आहे. 2019 मध्ये तिनं कबीर खानच्या टीमममध्ये सहभागी होत या प्रवासाची सुरुवात केली होती. 

असिस्टं डायरेक्टर अर्थात सहदिग्दर्शिका म्हणून ती इथं कार्यरत होती. टीमच्या म्हणण्यानुसार ती चांगलं कामही करत होती. 

अमियाच्या असण्यानं फारच मदत झाल्याचं कबीर खाननंही एका मुलाखतीत सांगितलं होतं. कपिल देव यांच्याकडे काहीही काम असल्यास आपण अमियाशी संपर्क साधत होतो, कारण ते अमियाला कोणत्याच गोष्टीसाठी नकार देत नहीत असा खुलासा कबीरनं केला होता. 

चित्रपटामध्ये कपिल देव यांचीही एक लहानशी भूमिका आहे. पाहुण्या कलाकारात्या रुपात दिसणाऱ्या कपिल देव यांना कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी अमियानं मदत केल्याचंही कबीरनं सांगितलं. 

1983 तील विश्वचषकादरम्यानच्या घटनांबाबतची बरीचशी माहिती कपिल देव यांच्याकडून मिळवून देण्यातही अमियानं मोलाची भूमिका बजावली होती.