मुंबई : यंदा दहावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. शिक्षकांना निवडणुकांच्या कामाचे पत्र आले आहे. तसेच दहावीच्या पर्यवेक्षकांनाही तात्काळ काम सुरू करण्यात आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दहावीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. दहावीची परीक्षा सुरू असून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. त्यामुळे निकाल लागेपर्यंत दहावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत सुरु झाली आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु झाली असून ती 22 मार्च सुरु राहणार आहे.