सीबीएसई शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देणार

मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांचे आश्वासन

Updated: Apr 1, 2020, 05:29 PM IST
सीबीएसई शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देणार title=

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पहिली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी सीबीएसईच्या शाळांबाबत असा निर्णय अजून घेतलेला नाही. सीबीएसईच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सीबीएसई शाळांमध्‍ये शिकणाऱ्या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने हा निर्णय घेण्‍याची मागणी भारत सरकारच्‍या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे केली होती.

कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता त्‍यांना पुढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय घेतला आहे. मात्र सीबीएसई शाळांनी अशा कोणत्‍याही सूचना सीबीएसई बोर्डानं दिल्‍या नसल्‍याचे सांगून यासाठी नकार दिल्‍याची बाब पालकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निदर्शनास आणली.

आ. मुनगंटीवार यांनी त्‍वरीत मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल व राज्‍यमंत्री संजय धोत्रे यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून सीबीएसई शाळांना स्‍पष्‍ट निर्देश देण्‍याची विनंती केली.

संजय धोत्रे यांच्‍याशी आ. मुनगंटीवार यांनी दूरध्‍वनीद्वारे चर्चा केली असता सीबीएसई द्वारा संचालित राज्‍यातील शाळांमध्‍ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्‍यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय लवकरच घेण्‍यात येईल, अशी माहिती आ. मुनगंटीवार यांना दिली आहे.