आजी-नातीची ही 'सत्य कहाणी' सर्व नात्यांना हादरवून टाकतेय....

या फोटोमागे एका आजीची आणि तिच्या नातीची सत्य कहाणी आहे. आजी आणि तिची नात यांच्या नात्याची ही कहाणी अनेकांना हादरवून टाकणारी आहे. 

Jaywant Patil Updated: Aug 24, 2018, 01:38 PM IST
आजी-नातीची ही 'सत्य कहाणी' सर्व नात्यांना हादरवून टाकतेय.... title=

अहमदाबाद : कल्पित एस भचेच यांनी काढलेला हा फोटो आहे, या फोटोमागे एका आजीची आणि तिच्या नातीची सत्य कहाणी आहे. आजी आणि तिची नात यांच्या नात्याची ही कहाणी अनेकांना हादरवून टाकणारी आहे. या फोटोमागील कहाणी १० वर्षांनी व्हायरल झाली आहे. नेटीझन्स आपआपल्या पद्धतीने ही कहाणी जज करीत आहेत, वरील फोटो १० वर्षानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. (फोटो साभार : कल्पित एस भचेच) (फोटो साभार : कल्पित एस भचेच)

यावर छायाचित्रकार कल्पित एस भचेच यांनी अगदी साध्यासोप्या शब्दात ही कहाणी जशी लिहिली आहे, ती जशीच्या तशी आम्ही तुम्हाला मराठीत देत आहोत..ही कहाणी खाली दिली आहे, नक्की वाचा.

फोटो पत्रकारितेत कसे योगायोगाने जुळून येतात पाहा, ही सत्य कहाणी याच बाबत आहे. तो दिवस होता १२ डिसेंबर २००७. माझ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी मी  सकाळी ९ वाजता माझ्या घरून निघालो. 

यावेळी पत्नी काळजी करत म्हणाली, रात्री वेळेवर घरी या, कारण उद्या तुमचा जन्म दिवस आहे, आणि आपल्याला केक देखील कापायचा आहे. मी खूप आनंदाने घरून निघालो. काही वेळातच माझ्या मोबालईवर अहमदाबादच्या मणीनगरच्या जीएनसी स्कूलमधून एक कॉल आला.

हा कॉल त्या शाळेच्या मुख्याध्यापिका रीटा बहन पंड्या यांचा होता. त्यांनी असं सांगितलं की, शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही वृद्धाश्रमात जात आहोत. हे सर्व कव्हर करण्यासाठी तुम्ही येऊ शकता का? असा त्यांचा प्रश्न होता. मी होकार दिला आणि घोडासरच्या मणिलाल गांधी वृद्धाश्रमात पोहोचलो. 

तेथे एका बाजूला मुलं बसली होती, आणि दुसऱ्या बाजूला आश्रमातील वृद्ध उभे होते. मी जरा आग्रह केला की, मुलांना आणि वृद्धांना जरा सोबत बसवू या म्हणजे मी आणखी चांगले फोटो घेऊ शकतो. 

मुलं उभी राहिली आणि त्याच क्षणी, एक शाळेतली मुलगी एका वृद्ध महिलेकडे बघून ढसाढसा रडू लागली. 

सर्वात धक्कादायक बाब ही होती की, समोर बसलेली ती वृद्ध महिला देखील हमसून हमसून रडू लागली. एका क्षणात ती मुलगी धावत गेली आणि त्या महिलेला बिलगली आणि त्या महिलेने देखील तिला मिठी मारली. हे दृश्य पाहून सर्व उपस्थित हैराण झाले. नेमकं काय झालं हे कळतंच नव्हतं.

मी त्याच वेळी हा फोटो माझ्या कॅमेऱ्यात कैद केला. हळूच गेलो आणि त्या महिलेला कमी आवाजात विचारलं तर, त्या महिलेने उत्तर दिलं, ही माझी नात आहे. त्या मुलीने ही रडत रडत सांगितलं की, ही माझी 'बा' आहे. गुजराथीमध्ये 'आजी'ला 'बा' म्हणतात.

ती मुलगी म्हणत होती, आजीशिवाय माझं मन लागत नाही. मला आजीची खूप आठवण येते. पुढील आणखी ऐकून तुम्ही थक्क व्हाल, या मुलीने सांगितलं की, माझी आजी नातेवाईकांकडे गेली आहे, असं मला माझ्या बाबांनी सांगितलं.

आजी आणि नातीसोबतची ती ताटातूट, आणि त्यांचं असं अचानक भेटणं, हे पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. हे वातावरण निवळण्यासाठी काही मुलांनी भजन आणि गाणी गायला सुरूवात केली.

हा फोटो दुसऱ्या दिवशी दिव्य भास्कर पेपरमध्ये पहिल्या पानावर छापून आला, त्यावेळी गुजरातमध्ये याची चर्चा झाली. या फोटोमागील कहाणीने अनेकांना हादरवून टाकलं. 

माझ्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये, पहिल्यांदा असं झालं की, पेपरमध्ये फोटो छापून आल्यानंतर मला १ हजार लोकांनी फोन केले, त्यावेळी राज्यभरात याच फोटोवर चर्चा होत होती. 

पण दुसऱ्या दिवशी मीडियातील पत्रकार या वृद्ध महिलेची मुलाखत घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा या वृद्ध महिलेने एका आई प्रमाणे उत्तर दिलं, 'मी माझ्या मर्जीने वृद्धाश्रमात आली आहे, आणि माझ्या मर्जीने मी इथे राहत आहे, माझ्या मुलाला बदनाम करू नका'.