बँडिट क्वीन'चा संघर्ष; २२ हत्या करणारी दरोडेखोर ते खासदार

भारतात 'बँडिट क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भारतीय महिला दरोडेखोर ते खासदार होण्यापर्यंतचा विलक्षण प्रवास...

Updated: Sep 6, 2019, 09:07 PM IST
बँडिट क्वीन'चा संघर्ष; २२ हत्या करणारी दरोडेखोर ते खासदार title=

कोमल वावरकर, झी मीडिया, मुंबई : भारतात 'बँडिट क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भारतीय महिला दरोडेखोर ते खासदार होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आहे. जिने राजकारणात पदार्पण केले. त्यानंतर तिची निवड सांसद म्हणून सुद्धा झाली. या महिलेचे नाव फूलन देवी आहे. फूलन यांना फार कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते.

फूलन यांचा जन्म १० ऑगस्ट १९६३ मध्ये उत्तर प्रदेशमधील एका 'गोरहा का पूर्वा' गावात झाला होता. फूलन देवी यांच्या कुटुंबाची जमीन ही त्यांच्या काकाने हडपली होती. फूलन यांनी जमीन मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यासाठी त्यांनी त्यांच्या काकाच्या मुलाबरोबर भांडणे सुद्धा केली.

फूलनचा असा राग पाहून त्यांच्या घरच्यांनी त्यांचा विवाह ११ वर्षांच्या वयात, त्यांच्यापेक्षा तिप्पट पटीने मोठ्य़ा असणाऱ्या माणसाबरोबर करून दिला. फार कमी वयात त्यांना खूप काही सहन करावं लागलं होतं. लग्नानंतर त्यांच्या पतीने सतत जबरदस्ती केली, फूलन यांच्यासाठी तो बलात्कारच होता. फूलनच्या सासरकडच्या लोकांनीही त्यांची फार छळवणूक केली.

सासरी असा अत्याचार झाल्यानं फूलन मोहरी परत आली. घरी परत आल्यावर त्यांच्या काकाच्या मुलाने त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला. त्यासाठी फूलन यांना ३ दिवसासाठी तुरूंगात जावं लागलं होतं .फूलन यांच्या घरची परिस्थिती ही फार बिकट होती.

या सर्व गोष्टीला फूलन कंटाळून गेल्या होत्या, त्यांची मैत्र काही वाईट लोकांबरोबर झाली. फूलन यांचे हे मित्र दरोडेखोर होते. या दरोडेखोरांना फूलन या फार आवडत होत्या. या दरोडेखोरांमध्ये फूलनसाठी भांडणे लागली. त्यानंतर दरोडेखोरांचा सरदार असणारा बाबू गुज्जरला विक्रम मल्लाह याने मारलं.

बाबू गुज्जरला मारल्यानंतर श्रीराम ठाकूर आणि लाल ठाकूर यांना राग आला होता. या हत्येचा सूड ठाकुरांना घ्यायचा होता. त्यानंतर फूलन, विक्रम मल्लाह आणि त्यांच्या साथीदारावर ठाकूरांनी हल्ला केला. यात विक्रम मल्लाह मारला गेला. विक्रम मल्लाह मेल्यानं फूलन यांना कैद करण्यात आलं.

त्यानंतर फूलन यांच्यावर फार अत्याचार झाला. त्यांच्या बरोबर रोज ३ आठवड्यांपर्यत सामूहिक बलात्कार होत गेला. त्यावेळी त्यांचे वय फक्त १८ वर्ष होते. फूलन यांनी हार मानली नाही. त्यांना या गोष्टीचा सुड घ्यायचा असं ठरविलं

फूलन या १९८१ मध्ये परत त्यांच्या गावात पोहचल्या. ज्या गावात त्यांच्यावर असा अत्याचार झाला होता. या गावातील २२ ठाकुरांची गोळी मारून फूलनने त्यांची हत्या केली. या घटनेने पूर्ण उत्तप्रदेश हादरून गेलं होतं. यानंतर फूलन यांना 'बँडिट क्वीन' म्हणून प्रसिद्ध मिळाली.

फूलन देवी याचं नाव ऐकल्यावर अनेकजण घाबरून जातं असतं. अशा घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत असणारे व्ही.पी.सिंग यांनी त्यांच्या पदावरून  राजानामा दिला. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी फूलनला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यात यश आले नाही.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ मध्ये एक घोषणा केली की, फूलन यांची फाशी माफ करण्यात येईल. जर त्यांनी आत्मसमर्पण केलं तर. त्यानंतर फूलन यांनी आत्मसमर्पण केलं. २२ हत्या, ३० दरोडे, १८ अपहरण केल्यानंतर त्यांना कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली झाली. फूलन देवी या ११ वर्ष तुरूंगात कैद होत्या.

यानंतर त्यांच्या आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं. १९९४ रोजी त्यांची सुटका झाली. उत्तर प्रदेशमधील अनेक गरीब नागरिक त्यांच्या बाजूने असत. त्यामुळे त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमधून १९९६ साली निवडणुकीत उतरल्यानंतर, फूलन या निवडणुकीत प्रचंड मताने निवडून आल्या.

फूलन या खासदार सुद्धा राहिल्या. २५ जून २००१ रोजी फूलन यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशी एक शेर सिंग राणा नावाचा एक व्यक्ती आला, त्याने बंगल्याच्या गेटजवळच फूलन यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

फूलन यांच्यावर एक ऑटो बायोग्राफी लिहिण्यात आली आहे. ज्यात त्यांनी त्यांचे वाईट अनुभव सांगितले आहेत. या ऑटो बायोग्राफीचं नाव 'किस्मत की मर्जी' आहे.