कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : एखाद्या हिरोला लाजवेल अशी शरीरयष्टी, उंची ही सहज डोळयांत भरणारी...तो गावातला गणप्या...! पण आज हा गणप्या पुरता हवालदिल झालेला...! त्याची आवडती सायकल कुणी तर चोरलेली...! जीवापाड प्रेम केलेली आयुष्याच्या चढ उतारात साथ दिलेली सायकल कोण चोरतो या विचारांनी तो पुरता रडवेला झाला...! नवऱ्याचे ते दु:ख बघून बायकोला काय करावे हे कळेना...! आपल्यापेक्षा नवऱ्याने सायकल वर प्रेम केलेले याची जाणीव बायकोला... शेवटी बायकोने गणप्याला पोलिसाकडे जायला सांगितले..! पोलिसांना तसा तो कायम घाबरणारा, पण सायकल चोरल्याचे दु:ख च एवढे मोठे की पोलिसांकडे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्याच्या ही लक्षात आले...!
शेवटी धीर धरून तो घरातून निघाला...! तोंडाला भले मोठे मास्क लावले आणि विचारांचे काहूर मनात चालू असताना तो एका पोलिस स्टेशन च्या दारात थबकला...! आत जाऊ की नको या विचारात तो होता, अखेर धाडस करत त्याने आत पाऊल टाकले..! नेहमीचा खेकसणार स्वर कानावर न पडता अगदी अदबीने त्याला कर्मचाऱ्याने येण्याचे कारण विचारले..! त्याला पहिला धक्का बसला तो इथेच...! त्याने सायकल चोरीला गेल्याचे सांगितले..! त्या कर्मचाऱ्याने पुढे जायला सांगितले..! तो एका केबिन मध्ये घुसला..! तिथल्या कर्मचाऱ्याने बसायला सांगितले...! थंड पाण्याची बाटली त्याला दिली...! चहा ही मागवला...! गणप्या आता बेशुद्ध व्हायची वेळ आलेली..! आपण पोलिसांबद्दल जे ऐकले ते किती खोटे होते या जाणीवेने तो मनात खजील झाला..! तुमची सायकल दोन दिवसात मिलेल असं कर्मचाऱ्याने सांगितल्यावर तर खुर्चीवरून पडतो की काय असं त्याला झाले..! पोलिसांच्या आश्वासना नंतर तो उठला आणि आत्यंतिक समाधानाने तो पोलिस स्टेशन बाहेर पडला....!
गावच्या दुसऱ्या टोकाला तिकडे पठाण चाचा ही मोठ्या चिंतेत बसलेले...! त्यांचे कपाळावर चांद असलेले बोकड रात्रीत कुणी तरी चोरलेले...! लॉकडाऊन मध्ये आर्थिक मदत होईल असं ते बोकड..! पुढचा तीन चार महिन्याचा खर्च भागेल अशी स्वप्ने त्या बोकडाच्या जीवावर त्यांनी पाहिलेली...! काय करायचे हा विचार त्यांना ही पडलेला...! तेवढ्यात गणप्या समोरून जाताना त्यांना दिसला...! सकाळी सकाळी कुठे गेलता त्यांनी विचारले...! गणप्याने झाला किस्सा सांगितला..! त्यांनी ही धाडस करत पोलिस स्टेशन गाठले...! पुन्हा तेच...! अदबीने विचारपूस, थंड पाण्याची बाटली आणि चहा...! पोलिसांचे विनम्र बोलणं आणि बोकड दोन दिवसात मिळवून देण्याचे आश्वासन... चाचा ही बेशुद्ध व्हायची वेळ...! पण आलेल्या अनुभवाने ते ही समाधानाने घरी परतले...!
दोन दिवसांनी गणप्या आणि चाचा दोघे पोलिस स्टेशन मध्ये...! ना सायकल ना बोकड...! चहा पाणी तर सोडाच बोलायला कोणी तयार नाही...! दोन चार दिवसात काय झाले दोघांना प्रश्न...! दोघे चर्चा करत असताना गणप्याची नजर कोपऱ्यात पडलेल्या पेपर वर पडली...! पोलिस आयुक्तांचा राजबिंडा फोटो....! वेषांतर करून आयुक्तांची पोलिस स्थानकाची पाहणी अशी बोल्ड हेडिंग...! क्षणात गणप्याची ट्यूब पेटली...! अरे दोन दिवसांपूर्वी मिळालेली ही अदब, वागणूक का होती हे त्याला समजले...! वेशांतर करून कोणी आले नाही ना ही भीती म्हणून ती वागणूक...! हा विचार त्याच्या मनाला शिवला आणि गणप्याने चाचाला निघायची खूण केली...! जाता जाता चाचाला त्याने तो पेपर हातात दिला आणि म्हणाला......
हाल चाल ठीक ठाक है, सब कुछ ठीक ठाक है...
आब-ओ-हवा देश की बहुत साफ़ है
रेमडिसिव्हीर का काला बाजार है..बेड के लिये मारा मार है...फिर भी
कायदा है, कानून है, इनसाफ़ है
आप की दुआ से बाकी ठीक ठाक है....!
(नुकत्याच पिंपरी चिंचवड मध्ये घडलेल्या वेषांतर नाट्यावर आधारित)