देवेंद्र फडणवीसाचं अचूक टायमिंग आणि सरकारची धावाधाव...

एरव्ही सरकारला आज, आता, या क्षणी उत्तर हवंय अन्यथा... असे अनेकदा इशारे देणारे, अडचणीत आणणारे प्रश्न विचारून सरकारला घाम फोडणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.. यांनी या अधिवेशनातही अचूक टायमिंग साधत सरकारसमोर अडचणी निर्माण केल्यात.

Updated: Mar 9, 2022, 08:44 PM IST
देवेंद्र फडणवीसाचं अचूक टायमिंग आणि सरकारची धावाधाव...  title=

महेश पवार, झी मीडिया, मुंबई : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे अधिवेशन कसे असेल याची चुणूक दाखविली. तर, मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपचा ९ तारखेला मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली.

३ मार्चपासून अधिवेशन सुरु झाल्यापासून विधिमंडळात फक्त एकाच नेत्याची चर्चा सुरु आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. आपल्या बुद्धिचातुर्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पाच दिवसात महाविकास आघाडी सरकारचं ( Mahavikas Aghadi Sarkar ) पुरतं 'वस्त्रहरण' केलंय. एका पाठोपाठ एक आरोपांच्या फैरी करत त्यांनी सरकारला मेटाकुटीला आणलंय.

राज्यपालांच्या अभिभाषणात सत्ताधारी पक्षांनी गोंधळ घातला. राज्यपाल ( Rajyapal ) आपलं भाषण अर्धवट सोडून विधानभवनातून निघून गेले. त्यावरूनही फडणवीस यांनी विधानसभेत सरकारवर टीका केली. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आपल्या सहकाऱ्यांसह विधानसभेत गदारोळ करून कामकाज तहकूब करायला भाग पाडलं.

राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाली ती केवळ ओपचारिकता म्हणून. अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackreray ) वर्षा येथून निघालेही होते. मात्र, याच दरम्यान विरोधकानी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न लावून धरत कामकाज बंद पाडले.   

अचूक टायमिंग कसं असतं हे फडणवीस यांनी वेळोवेळी दाखवून दिलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackreray ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Dy. CM Ajit Pawar ), वकील प्रवीण पंडित चव्हाण ( Ad. Pravin pandit Chavhan) , पोलीस अधिकारी संगीता चव्हाण यांच्यासह अनेकांची नावे घेत त्यांनी विधानसभेत पेन ड्राईव्हद्वारे व्हिडीओ बॉम्ब फोडला.

फडणवीस हे एकामागोमाग एक आरोप करत राहिले आणि विधानसभेत उपस्थित असणारे कुणीही मंत्री त्यांना रोखण्याची हिम्मत करू शकले नाही. कारण, त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांचे नाव घेतले नाही. पण, 'बडे साहेब' असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी संशयाची सुई शरद पवार यांच्याकडे वळविली होती.

विधानसभेच्या नियमाप्रमाणे जी व्यक्ती सभागृहाचा सदस्य नाही त्या नेत्याचे नाव सभागृहात घेता येत नाही. ज्या मंत्र्यावर आरोप करायचे असतील त्यांना आधी नोटीस देणं गरजेचे असते. या नियमाचा दाखला देत एरव्ही अनेक नेत्याची नावे, त्यांच्यावर केलेले आरोप सभागृहाच्या पटलावरून काढून टाकण्यात आलेत. परंतु, काल फडणवीस आरोप करत असताना सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे आमदारही जणू मंत्रमुग्ध झाले होते. सत्ताधाऱ्याना या नियमाचे भान राहिले नव्हते. फडणवीस यांनी आरोप केला, व्हिडीओ बॉम्ब फोडला आणि आपलं भाषण संपवून ते विधानसभेतून निघून गेले.

त्यानंतर किती तरी वेळ विधानभवनात एक अनामिक शांतता पसरली होती. हा सत्ताधाऱ्यांना बसलेला धक्का होता का? या धक्यातून सावरताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 'सिल्व्हर ओक'वर धाव घेत शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनतर रात्री बैठका झाल्या. गृहमंत्री वळसे पाटील ( Home Miister Dilip Valse patil ) यांनी विधानसभेत उत्तर देऊ असे सांगितले. त्यानुसार आज सभागृहात उत्तर देण्यासाठी सर्व तयारी करून गृहमंत्री आलेही पण.. इथेही बाजी मारली ती फडणवीस यांनीच.

राज्याचा अर्थसंकल्प ११ तारखेला मांडण्यात येणार आहे. १० तारखेला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येणार आहे. मंत्री नबाव मलिक यांच्या राजीनाम्यासाठी ९ तारखेला भाजपचा मोर्चा या तारखा आधीपासूनच ठरलेल्या आहेत. असे असतानाही फडणवीस यांनी व्हिडीओ बॉम्ब फोडण्यासाठी ८ तारखेचा मुहूर्त निवडला.

९ तारखेला भाजपचा मोर्चा.. सकाळी ११ वाजता सभागृह सुरु झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील त्यावेळी उपस्थित होते. प्रश्नोत्तराचा तास संपला आणि फडणवीस यांनी पुन्हा मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याचा विषय काढला. त्यावरून गदारोळ झाला. पांढर मिनिटासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. जेव्हा कामकाज सुरु झालं तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले त्याचे उत्तर देण्यास मी तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते यांनी हे उत्तर उद्या द्यावे अशी विनंती केली आहे. त्यामुळे उद्या (१० मार्च ) हे उत्तर देईन असे सांगितले.

१० तारखेला पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. त्यामुळे गृहमंत्री यांनी दिलेल्या उत्तराला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही याची काळजी देवेंद्र फडणवीस यांनी पुरेपूर घेतल्याचे दिसते. पाच राज्यांमध्ये भाजप विजयी झाले किंवा सत्तेच्या जवळपास जरी आले तरी राज्यातले भाजपचे प्रमुख नेते म्ह्णून प्रसिद्धीची वलये त्यांच्याभोवतीच निर्माण होणार आहेत. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जे काही उत्तर असेल ते केवळ पटलावर येण्यासाठी केलेलं भाषण असेल... अर्थात योग्य टायमिंग सोडून चर्चेत कसं रहावं याचं उत्तम तंत्रज्ञान फडणवीस यांना अवगत झालंय हे मान्य करावंच लागेल. त्यामुळेच तर सरकारची धावाधाव होतेय.