मुंबई : आपल्याला होणाऱ्या रोगांचे किंवा व्याधींचे प्रकार मागील शतकापेक्षा खूप प्रमाणात बदलले आहेत. संसर्गजन्य रोगांवर आपण जवळ जवळ मात केली आहे. पण या रोगांची जागा आता नव्या रोगांनी घेतली आहे. जसे की आपल्या नव्या अशा विशिष्ट रहाणीमानामुळे, आहारातील बदलांमुळे अथवा आजच्या धकाधकीच्या जीवनात उद्भवणाऱ्या विलक्षण ताण तणावामुळे, रक्तदाब, मधुमेह इत्यादींनी घेतली आहे. या सर्व स्थित्यंतरांबरोबर वैद्यकीय शास्त्रात वाखाणण्याजोगी उत्क्रांती होत गेली आणि माणसाचा एकूण जीवन काळ वाढला. अर्थात या चांगल्या गोष्टीची दुसरी बाजू मात्र तितकीशी चांगली नाही. जागतिक पातळीवर वृध्दांचे वाढलेले आयुष्यमान, त्यांची वाढणारी संख्या त्यामुळे लोकसंख्येवर पडणारा ताण आणि वृध्दत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी यांना आजचा समाज सामोरा जात आहे.
वैद्यकीय क्षेत्रात झालेली आजची ही प्रगती औषध शास्त्रातील समांतर प्रगती शिवाय अशक्यच होती. वजनाने व आकाराने अतिशय लहान अशा रासायनिक औषधानंतर आपण अँटीबायोटीक्सचा शोध लावला. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची झेप म्हणजे शेराप्युटिक प्रोटीन्संचा शोध म्हणजे मानवी प्रथिनांचा औषध म्हणून उपयोग, उदा इन्शुलीन जे मधुमेहींसाठी जीवनदान ठरले किंवा इरिथ्रोपोएटीन जे किडनी फेल्युअर च्या रोगांसाठी अपरिहार्य असते ही अशी प्रथिने रि कॉम्बिनंट टेक्नॉलॉजी च्या सहाय्याने बनवली जातात. या प्रक्रियेमध्ये ही प्रथिने तयार करणारी मानवी जनुके पेशीतून वेगळी करुन विशिष्ट अशा दुसऱ्या जातीच्या लहान पेशींच्या जनुकाबरोबर जोडली जातात. या लहान पेशी खुप मोठया प्रमाणात आणि खुप भराभर व्दिगुणीत होतात आणि शेवटी मानवी प्रथिनं, ज्याचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो तयार करतात.
औषध शास्त्रातील तिसरी महत्त्वाची उडी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम अवयव उदा. गुडघा – रोपण, मणका- रोपण, ह्रदयाची कृत्रिम झडप इत्यादी. या प्रकारच्या शस्त्रक्रिया या हल्ली सहजपणे केल्या जातात. आज आपण इतकी प्रगती केली असली तरी सुध्दा आपल्याला होणाऱ्या, होऊ शकणाऱ्या कैक व्याधी अशा आहेत की त्यांच्यासाठी या आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये काहीही उपाय आजतरी अस्तित्वात नाही.
शास्त्रात होणारी प्रगती ही एक निरंतर अव्याहत गोष्ट आहे. गेल्या दोन अडीच दशकांपासून स्टेम सेल्स मातृक पेशी आणि रि जनरेटिव्ह मेडिसीन किंवा पुनर्निमिती औषधोपचार ह्या दोन आघाड्यांवर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे आणि औषध शास्त्राच्या तंबूचा चौथा खांब म्हणून प्रचलित होऊ लागला आहे.
स्टेम सेल्स म्हणजे काय
माणसाचा उगम हा बीजांडापासून होतो. माणसाच्या शरीरात असणाऱ्या विभिन्न प्रकारच्या असंख्य पेशी बनवण्याची क्षमता या बीजांडामध्ये असते. अर्थातच ही प्रक्रिया टप्प्या टप्प्याने होत असते आणि अर्भकापासुन ते अगदी मरणासन्न अशा व्यक्तिंपर्यंत सर्वांमध्ये या अशा बीजांडपेशी किंवा मातृक पेशी म्हणजेच स्टेम सेल्स असतात. मूलत शरिरात रोजच्या रोज होणारी झीज भरुन काढण्याचे काम या मातृक पेशी करीत असतात.
या मातृक पेशी मुख्यत्त्वेकरुन दोन प्रकारच्या असतात.
रक्त मातृक पेशी
उती मातृक पेशी
माणसाच्या शरिरातील कुठल्याच पेशी या अमर नसतात. रक्तपेशीसुध्दा काही विशिष्ट अवधीनंतर मरतात आणि त्यांची पुन निर्मिती होते. माणसाच्या हाडांच्या मगजामध्ये ही सातत्याने होणारी घटना असते आणि म्हणून अथवा अस्थि मगज हा रक्त मातृक पेशींचा एक उत्तम साठा मानला जातो. कर्करोग वा तत्सम रोगांमध्ये होणारे बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट हे या तत्त्वावर आधारित असतात.
नवजात बालकाच्या नाळेतील रक्तात देखील रक्त मातृकपेशी खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. गेल्या ८ १० वर्षांमध्ये भारतात आणि इतर देशांत कॉड ब्लड स्टेम सेल्स बँकांचे पेव फुटले आहे. नाळेतील रक्त मातृक पेशी देखील रक्ताचे कर्करोग आणि बीटा थॅलेसेमीया सारख्या रोगात वापरुन बरे करता येतात.
उती मातृक पेशी या पौढ माणसाच्या बऱ्याच अवयवांमध्ये आढळून येतात. अस्थि मगजा व्यतिरिक्त या पेशी कातडी, मेदपेशी, पडलेला दुधाचा दात, अंगावर येणारा स्त्राव व इतर काही अवयवांत सापडतात. आता पर्यंत संशोधकांना या उती मातृक पेशींपासून ह्रदय स्नायू पेशी, मज्जातंतू पेशी, अस्थिपेशी, स्वादुपिंड पेशी आणि यकृत पेशी तयार करण्याचे यश मिळाले आहे.
आतापर्यंत आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये अनेक रोग आणि व्याधी अशा आहेत की या व्याधींसाठी कोणतेही उपाय माहित नाहीत किंवा माहित असलेले उपाय अगदी तुटपुंजे आहेत. स्पायनल कॉर्ड इन्जुरी अपघातामुळे मज्जारज्जू निकामी होऊन आलेले अपगंत्व, सेरेब्रल पाल्सी जन्माच्या वेळी अर्भकाच्या मेंदूला प्राणवायू कमी मिळाल्याने येणारे शारिरीक व मानसिक अपंगत्व ऑटिझम अनेक प्रकारचे स्नायु अधू करणारे अनुवांशिक रोग अशा अनेक व्याधीग्रस्त माणसांसाठी स्टेम सेल्स थेरपी हे एक वरदान ठरत आहे. उती मातृक पेशी उपरोक्त व्याधीग्रस्तांच्या व्याधी पूर्णपणे बऱ्या करु शकत नसल्यातरी या उपचारांमुळे अशा रोग्यांची देखभाल करणाऱ्या नातेवाईकांना त्यामुळे खुपच दिलासा मिळू शकतो आणि त्यांचे तसेच रोग्यांचे जीवन जास्त आनंदी होऊ शकते.
ही वाचारधारणा खुपच व्यापक आहे. स्टेम सेल्स उपचारांव्यतिरिक्त वेगवेगळ्या अवयवांची निर्मिती आणि रोपण काही विशिष्ट औषधांच्या वाहकांसारखा चा उपयोग, जनुकीय उपचार या व अशाच अनेक कल्पक उपचार पध्दतींचा समावेश यात होऊ शकतो.
ग्रीसमध्ये एक पौराणिक कथा प्रचलित आहे. प्रोमेथियस या राजाने स्वर्गातून पवित्र असा अग्नि मानवाच्या उध्दारासाठी चोरुन आणला. झीथस या देवांच्या राजाला याचा खुप राग आणि आणि त्याने प्रोमेथियसला शिक्षा सुनावली. त्याला एका उंच टेकडीवर खडकाला साखळदंडाने बांधून टाकले आणि एका गरुड पक्षाला आज्ञा केली की त्याने रोज प्रोमेथियसचे यकृत थोडे थोडे कुरतडायचे. झीथसला वाटले की यामुळे प्रोमेथियसचा अंत अगदी वेदनामय पध्दतीने होईल. परंतु तसे न होता प्रोमेथियस नंतर बरीच वर्षे जगला. या गोष्टीवरुन एक निष्कर्ष असा काढता येईल की, यकृत हे कुरतडल्यानंतर ही पुन जिवित होत राहिले. आणि दुसरे अनुमान असे की यकृत हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे हे ग्रीकांना ५००० वर्षांपूर्वी माहित होते.
सारांश असा की हे एक नवीन शास्त्र वैद्यकशास्त्रात मिळालेले एक जीवनदान आणि म्हणून अनुदान आहे.
डॉ. प्रदिप महाजन(स्टेम सेल ट्रान्सप्लांट सर्जन)